मुंबई - आदर्शमधील बेनामी फ्लॅट्सच्या मालकांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या सर्व बेनामी मालमत्तांची चौकशी केल्यास अनेक बडी नावे समोर येतील असा विश्वासही शिवसेनेने व्यक्त केला आहे.
अहवालाच्या प्रमुख निष्कर्षामध्ये आदर्शमधील बेनामी फ्लॅट्सधारकांवर खटले भरा, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे हे फ्लॅट्स ज्यांच्या आशीर्वादाने मिळाले आहेत त्या सर्वांची नावेही जनतेला कळली पाहिजेत, यासाठी या सर्व बेनामी प्लॅट्सच्या आर्थिक व्यवहारांची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते आमदार सुभाष देसाई यांनी केली आहे.
वीस हजार रुपये एवढे मासिक उत्पन्न हा या फ्लॅट्स मिळवण्यासाठीच्या निकषांमधील प्रमुख निकष होता. मग या फ्लॅट्सधारकांना साठ लाखांची कर्जे कशी मिळाली? त्यांना कर्ज देणा-या कंपन्यांचीही चौकशी केल्यास अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येतील, असेही देसाई म्हणाले.