आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल स्पर्धेला मनोरंजन करातून सूट नको, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलच्या मॅचेस मनोरंजन नसून खेळ असल्याने त्यांना मनोरंजन करातून सूट दिली जाऊ नये, असे आपले व्यक्तिगत मत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. आयपीएल मॅचेसना मनोरंजन करात दिलेली सूट काढून घेता येईल का, याबाबत विचार करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आयपीएलला मनोरंजन करात सूट देण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करून त्यात तेव्हाचे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनाही पक्षकार केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनीही मनोरंजन कर माफ केल्याने राज्य सरकारवर टीका केली होती.

आयपीएलला मनोरंजन करात सूट देण्यावरून तुम्ही सरकारला धारेवर धरले होते. आता तुमचे सरकार आहे, आयपीएलवर मनोरंजन कर लावणार का, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, अाठव्या सत्रातील आयपीएलवर मनोरंजन कर लावलाच पाहिजे, असे माझे व्यक्तिगत मत आहे; परंतु आता मी मुख्यमंत्री असल्याने याबाबत काय करता येईल याचा लवकरच विचार केला जाईल. आयपीएलवर मनोरंजन कर लावावा, असे माझे मत असल्याने विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तटकरे यांनी दिली होती सूट
देशात आता आठव्या सत्राच्या आयपीएल स्पर्धेतील सामने सुरू झालेले आहेत. काही सामने मुंबईतही होणार आहेत. आयपीएल मॅचेसच्या तिकिटांवर मनोरंजन कर लावू नये, असा निर्णय तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी घेतला होता. खरे तर २५ टक्के कर लावण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला असतानाही सुनील तटकरे यांनी मनोरंजन कर रद्द करण्याची घोषणा विधिमंडळात केली होती. कॅगनेही राज्य सरकारच्या या निर्णयावर नाराजी प्रकट करत २००८-०९ मध्ये राज्य सरकारचे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता. एवढेच नव्हे, तर पोलिस सुरक्षेपोटी लाखो रुपये आयपीएल आयोजकांनी थकवल्याचेही कॅगने आपल्या अहवालात गेल्या वर्षी म्हटले होते.