आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- एकेकाळी ‘कुठे गेला होतास’, असे विचारले तर मोठ्या रुबाबाने ‘इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा घेऊन आलोय’, असे अभिमानाने सांगणारा मोठा वर्ग ‘बॉम्बे’मध्ये होता. मात्र, सध्याच्या मायानगरी मुंबईत पूर्वी असलेल्या 400 पैकी केवळ 30 इराणी हॉटेल्स शिल्लक आहेत.
मुंबईत आजघडीला स्ट्रीट फूडची चलती आहे. चायनीज, वडापाव, पाणीपुरी आणि सँडविच या पदार्थांनी सर्वांना भुरळ पाडली आहे. त्यामुळे पूर्वीसारखे कॅफेमध्ये जाणारे लोक मुंबईत दुर्मिळ होत आहेत. तरीदेखील काही शौकीन इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन मनसोक्त भोजन आणि चहाचा आस्वाद घेतात.
धोबीघाट तलाव या परिसरात ‘बासंती’, ‘ब्रुबन’, ‘मेरवान’ आणि ‘लाइट एशिया’ सारखे हॉटेल्स होते. पूर्वी लोक येथे गप्पाटप्पा करत चहा पीत वर्तमानपत्र वाचण्याचा आनंद लुटत. मात्र, आता बदलत्या काळानुसार आजच्या पिढीला इराण्यांच्या हॉटेलची भुरळ कमीच पडते. वाढते कर, महागाईमुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे अनेक हॉटेलचालक सांगतात.
मेट्रो चित्रपटगृहाजवळ फारुख शोकरी यांच्या मालकीचा कयानी कॅफे आहे. त्याची परदेशातही ख्याती होती. मात्र, तिसºया पिढीला हा व्यवसाय जमला नाही. त्यामुळे यातील अनेक जण सध्या परदेशात स्थायिक झालेत. वाढत्या स्पर्धेमुळे काही मालकांनी कॅफेचे बिअर बारमध्ये परिवर्तन केले आहे. उडपी हॉटेल्समुळे स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे आम्हीही त्यांच्याप्रमाणे पदार्थ कॅफेमध्ये ठेवतो. आमची ओळख असलेले बन मस्का आणि चायवर आम्ही तग धरू शकत नसल्याची खंत शोकरी यांनी व्यक्त केली.
महाराणी एलिझाबेथ यांची भेट रद्द
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही कॅफेत काँटिनेंटल डिशेस ठेवत होतो. याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांना तिखट पदार्थ आवडत नव्हते. ब्रिटानिया कॅफेच्या उद्घाटनासाठी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ येणार होत्या. मात्र, खासगी कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला, त्याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया कॅफेचे मालक बोमन कोहिनूर यांनी दिली.
12.5 टक्के सर्व्हिस टॅक्स असल्याने कंबरडे मोडल्याचे शोकरी म्हणाले. ब्रुन बे्रड, बन मस्का, ऑम्लेट, चिकन आणि मटनसोबत पारसी आणि मोगलाई डिशेस आम्ही ठेवत असल्याचे बेहरम खोसरवी या कॅफेचालकाने सांगितले.
अभिषेक ब्रिटानियाचा चाहता
दक्षिण मुंबईतील ब्रिटानिया कॅफेचा अभिषेक बच्चन मोठा चाहता आहे. या परिसरात तो आल्यास कॅफेला नेहमी मित्रांसोबत भेट देतो. कोहिनूर त्याला ‘बॅड बॉय’ नावाने संबोधतात. ऐश्वर्याला कॅफेत न आणल्यास तुला प्रवेश देणार नाही, अशी तंबीही त्याला दिल्याचे कोहिनूर अभिमानाने सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.