आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचनाबाबत चर्चा आज रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सिंचनाबाबत चर्चा करायची की नाही याबाबत विधान परिषदेत गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेला तिढा सोमवारी सुटला. शिवसेना- भाजपच्या आमदारांनी सभागृहात बाके सोडून जमिनीवर ठाण मांडत मूक आंदोलन केल्याने नरमलेल्या सरकारने अखेर मंगळवारी या विषयावर चर्चेची तयारी दाखवली.

सिंचनावरील चर्चेला परवानगी द्या आणि दिवाकर रावते यांचे निलंबन मागे घ्या, अशा मागण्या विरोधकांनी सोमवारी सभागृह सुरू होताच मांडल्या. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही सभागृहाच्या कामकाजात भाग न घेता खाली बसणार आहोत, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी जाहीर केले. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी वारंवार आवाहन करूनही विरोधक बाकांवर बसत नव्हते. त्यामुळे सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, विरोधकांविना सभागृहाचे कामकाज चालवणे योग्य नाही, असा मुद्दा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मांडला. त्यानंतर अध्र्या तासासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.


उपमुख्यमंत्री चर्चेला तयार
सभागृह वारंवार तहकूब होत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचनावरील चर्चेला सरकारची तयारी असल्याचे जाहीर केले, परंतु रावते यांच्या निलंबाचा मुद्दा पुढे करत विरोधकांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे पुन्हा अध्र्या तासासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.


सभापतींकडे बैठक
सभापतींच्या दालनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते व गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर विरोधकांनी आंदोलन मागे घेत कामकाजात भाग घेतला. अनधिकृत संस्थाविषयीचे विधेयक मंजूर करून सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

काय आहे प्रकरण?
विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी सिंचन घोटाळ्यावर 260 अन्वये चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर चर्चा नको, असा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी उपस्थित केला होता. सभापतींनीही या विषयावरील चर्चेस परवानगी नाकारली होती. हा तिढा सोडवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी सभापतींना अपशब्द वापरले. त्यामुळे शुक्रवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

शिवसेना, भाजपचा सत्याग्रह
सत्ताधारी सदस्य आमची मुस्कटदाबी करत आहेत. त्यामुळे महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने विरोधकांनी मूक आंदोलन पुकारल्याचे विनोद तावडे म्हणाले. शिवसेना-भाजपला गांधीजींचे नाव उच्चरायचा अधिकार नाही, असा प्रतिवाद राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी त्यावर केला.