आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटदार, राजकारण्यांच्या अभद्र युतीला बसणार चाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे आणि जलविद्युत प्रकल्पांच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यापासून अगदी कंत्राटदाराच्या करारनाम्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हाव्यात यासाठी एक नवी प्रणाली राज्य सरकार विकसित करत अाहे. या प्रणालीमुळे कंत्राटदार आणि राजकारण्यांच्या अभद्र युतीला चाप बसून भ्रष्टाचार कमी होण्यास मदत तर होणारच आहे, त्या सोबतच जलसंपदा विभागाची किचकट प्रक्रिया सुलभ होऊन तांत्रिक विलंबही टळणार आहे.

जलसंपदा विभागाच्या कामाची पद्धत लक्षात घेता कंत्राटांची अंदाजपत्रके तयार करणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता घेणे, निविदांचे प्रारूप तयार करणे आणि करारनामा व्यवस्थापन करणे यासारख्या कामांसाठी आता “ऑनलाईन ईस्टीमेट अॅन्ड काॅन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट म्हणजेच ईस्टीकॉम प्रणाली विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही प्रणाली विकसित करण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. जलसंपदा विभागात सरकारी नियमांना बगल देत मनमानी पद्धतीने कामकाज केल्याची अनेक उदाहरणे अाहेत. मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे मिळावीत यासाठी निविदा प्रक्रियेतील निकष बदलणे, कामाची प्राथमिकता लक्षात घेता कंत्राटे देणे, कार्यारंभाचे आदेश नसतानाही कंत्राटदाराला अग्रीम रक्कम अदा करणे, कामे अपूर्णावस्थेत असतानाही देयके अदा करणे, दरवाढ कमी असतानाही अवाच्या सव्वा दरवाढ दाखवून संगनमताने कामाच्या सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून प्रकल्पांच्या किमती वाढवणे अशा अनेक बाबींमुळे राज्यातील जलसंपदा प्रकल्प रखडले आहेत. निधी खर्च होऊनही अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. या सर्व प्रकारांना ईस्टीकॉम प्रणालीमुळे चाप बसणार आहे. तसेच कंत्राटदारांचा थेट हस्तक्षेप कमी होऊन ही सगळी कामे ऑनलाईन आणि पारदर्शी पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.

समितीची स्थापना, कृती आराखडा महिनाभरात
ईस्टीकॉमप्रणाली विकसित करताना प्रचलित शासन प्रक्रियेत काही तांत्रिक बदल करण्याबाबतच्या शिफारसीही मोहिते यांची समिती सुचवणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासाठीचा कृती आराखडा महिन्याभरात तयार केला जाणार असून त्यानंतर समितीचा कार्यकाळ निश्चित केला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...