आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrigation Work , Well Work Completing Through MNGRA

राज्यातील सिंचन, विहिरींची कामे आता मनरेगामार्फत होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जवाहर तसेच धडक सिंचन विहीर कार्यक्रमातील अनुसूचित जाती, जमातीच्या व लहान शेतकर्‍यांच्या प्रगतिपथावरील 11 हजार 529 विहिरी, तसेच सर्वसाधारण लाभार्थींच्या 12 हजार 991 अशा 24 हजार 520 विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत पूर्ण करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत जवाहर विहीर ही लोकप्रिय अशी जुनी योजना असून सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 40 हजार इतक्या विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. ही योजना अनुदानित स्वरूपाची प्रतिपूर्ती योजना असून सद्य:स्थितीत या योजनेअंतर्गत लाभार्थींना विहिरीची कामे पूर्ण करण्यासाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गाच्या लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळतो.
ही योजना पंतप्रधान पॅकेजचा एक भाग म्हणून धडक सिंचन विहीर या नावाने विदर्भातील 6 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असून याअंतर्गत मोठय़ा प्रमाणावर विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत या योजनेअंतर्गत देण्यात येणारे एक लाख रुपयांचे अनुदान विहिरीची कामे पूर्ण करण्यास अपुरे आहे. त्यामुळे राज्यात 24 हजार 520 विहिरी अपूर्ण आहेत. त्याच वेळेस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रांतर्गत विहिरींसाठी प्रत्यक्षात होणार्‍या खर्चाची रक्कम तीन लाख रुपयांच्या मर्यादेत अदा करण्यात येते.
त्यामुळे सध्या ही योजना राज्यात जास्त लोकप्रिय आहे.
सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी असलेल्या या योजनेत सद्यस्थितीत प्रती विहिर देण्यात येत असलेल्या एक लाख रुपये अनुदानात, एक लाख 50 हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्यात येत असून एकूण अनुदान दोन लाख 50 हजार इतके करण्यात येत आहे. हे अनुदान विहीरी 30 जून 2014 पर्यंत पूर्ण करण्याच्या अटीवर देण्यात येईल. या प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या विहीरी पूर्ण करण्यासाठी शासन 258 कोटी रुपये इतके अतिरिक्त अनुदान खर्च करेल.