मुंबई- दुबईत अटक करून भारतात आणण्यात आलेला इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी सुलतान अहमद फैजान याने सपाचे नेते व आमदार अबू आझमींशी आपले संबंध असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आझमी अडचणीत येण्याची शक्यता आहे. आझमी यांनी आपण फैजानला ओळखतो अशी कबुली दिली आहे.
दहशतवादी कारवायात अडकलेल्या फैजानला फेब्रुवारी महिन्यात दुबईत अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते. शुक्रवारी त्याला भारतात आणण्यात आले. दिल्ली पोलिसांनी फैजानशी चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान फैजानने अबू आझमींशी आपली ओळख असल्याचे व त्याच्यासोबत व्यवसाय केल्याचे सांगितले. 1980 साली अबूसोबत मी भागीदारीत प्लेसमेंट एजन्सी सुरु केली होती. या एजन्सीद्वारे आम्ही भारतातील लोक नोकरीसाठी दुबईत पाठवत होतो असे त्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, अबू आझमींनी खासगी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आपण फैजानला ओळखतो. 80 च्या दशकात आम्ही एकत्र काम करीत असे. मात्र, कालांतराने त्याचा आणि माझा मार्ग वेगळा झाला. तो दुबईला निघून गेला व मी राजकारणात स्थिरावलो. त्यानंतर फैजानचा आणि माझा कोणताही संबंध नाही. तो सध्या काय करतो याचीही आपल्याला माहिती नसल्याचे अबू आझमी यांनी म्हटले आहे.