आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Uddhav Thackeray Cheif Minister Candiate Of Mahayuti

उद्धव ठाकरे महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार?, मुंडेंनीही दिला पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपल्याला दिल्लीपर्यंत धडक मारायची आहे. देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार आणायचे आहे अशी गर्जना करून युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे हे महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत. यावर भाजपचे नेते आणि महायुतीचे शिल्पकार गोपीनाथ मुंडे यांनी उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाला आपला पाठिंबा असेल, असे लगेच जाहीर करून टाकले आहे. तर, आरपीआयचे नेते व महायुतीतील तिसरे भागीदार रामदास आठवले यांनी ज्यांचे आमदार जास्त त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद, असे जाहीर केले आहे.
आदित्य ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय गोटात चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर आदित्य यांनी माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नाही. शिवशाही सरकार यावे असा जो शब्दप्रयोग केला जातो, त्या अर्थाने मी म्हटले आहे असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आदित्य यांनी असे वक्तव्य करून आगामी काळात जर महायुतीचे सरकार आले तर महायुतीकडून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे सांगून पिल्लू सोडले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे गेल्या 15 वर्षांपासून सरकार आहे. केंद्रातही गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसचेच सरकार आहे. मात्र, मागील दोन-तीन वर्षापासून काँग्रेस सरकारला देशातील व राज्यातील जनता कंटाळली असल्याचे दिसून येते. देशात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचा दावा भाजप व मित्रपक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे 15 वर्षे सत्ता असलेल्या महाराष्ट्रातही काँग्रेस आघाडीचा पराभव होईल व महायुतीचे सरकार येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच भाजप-सेना युतीला सुरवातीलाच दोन-तीन मित्रपक्ष मिळाले आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन टळणे शक्य होणार आहे. त्यामुळेच राज्यातील भाजप-सेनेतील नेत्यांना यावेळी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल व महायुतीची सत्ता येईल असे वाटत आहे.
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपद कोणाकडे यावर चर्चा झडू लागल्या आहेत. युती व आघाडीच्या वाटपसूत्रानुसार ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार 1995 मध्ये जास्त आमदार असलेल्या सेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले होते. पुढे काँग्रेस-राष्ट्रवादीनेही तोच फॉर्म्युला वापरला व आजही सुरु आहे. त्यामुळेच आगामी काळात सेनेचे जास्त आमदार निवडून आले तर सेनेचाच मुख्यमंत्री होईल व मुख्यमंत्रीपद उद्धव यांच्याकडेच जाईल असे आदित्य यांनी संकेत दिले आहे. याद्वारे सेनेतील नेत्यांनाही आदित्य यांनी सूचित केले आहे की, महायुतीचे सरकार आले तर उद्धव हेच मुख्यमंत्री होतील व पक्षाची सारी सूत्रे त्यांच्याकडेच राहतील.
मुंडेंचा पाठिंबा-
आदित्य यांच्या वक्तव्याबाबत भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांना छेडले असता त्यांनी तत्काळ उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाला माझा पाठिंबा आहे असे सांगितले. यामागेही काही राजकीय गणिते असल्याचे दिसून येत आहे. गोपीनाथ मुंडे यांची मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा कधीही लपून राहिली नाही. ते आजही नेहमीच आवेशात येऊन पुढील मुख्यमंत्री मीच, पुढील गृहमंत्री मीच, देशाचा पुढील कृषिमंत्री मीच असे भाषणात सांगतात. मात्र आता येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूका लक्षात घेता व भाजपचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता जास्त असल्याने मुंडे केंद्रात मंत्रिपद मिळविण्यासाठी आशावादी आहेत.
गोपीनाथ मुंडे बीडमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्यापेक्षा केंद्रात भाजपची सत्ता येण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा लढवून सरकार आले तर केंद्रात मंत्रिपद मिळवायचे व राज्यातील विधानसभेच्या वेळी नवा डाव मांडायचा अशी खेळी मुंडे यांची असू शकते. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला त्यांनी तत्काळ पाठिंबा जाहीर केला आहे. याचबरोबर पक्षातील नेत्यांपेक्षा मुंडे यांना उद्धव ठाकरे हे अधिक जवळचे व सुरक्षित वाटतात. ठाकरे आणि मुंडे यांची नाळ 20-25 वर्षापासून कायम आहे. तसेच भाजप-सेनेच्या महायुतीचे बाळासाहेब ठाकरे- प्रमोद महाजन यांच्याबरोबरच मुंडेही शिल्पकार आहेत.