आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तरांचे ओझे कमी करा; महिन्यात शाळांना द्या सूचनाः उच्च न्यायालया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत सरकारने नेमलेली समितीने काही उपाययोजना सूचविल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांना महिन्याच्या आत परिपत्रक पाठवा’, असे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.

न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि शालिनी फणसाळकर- जोशी यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, दप्तराच्या ओझ्याबाबत राज्यातील शाळांत नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या सुधारणेसाठी स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. सर्व शाळांना हे परिपत्रक पाठवण्यात यावे.

तसेच यात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार लॉकर्स पुरवावेत. विद्यार्थ्यांच्या दप्तरातील वजनाचाही यात उल्लेख करण्यात यावा, असेही न्यायालयाने म्हटले. या वेळी सरकारी वकील अंजली हेलेकर म्हणाल्या, राज्यात एक लाखाच्या वर शाळा आहेत. त्यामुळे सर्वच शाळांना परिपत्रक पाठवण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यावर न्यायालयाने शाळांना ई-मेलने परिपत्रक पाठवण्याचा पर्याय सुचवला.

६० टक्के विद्यार्थ्यांना पाठीचे आजार
एका अहवालानुसार विद्यार्थ्यांच्या वयाच्या तुलनेत त्यांच्या दप्तरांचे ओझे हे २० ते ३० टक्क्यापर्यंत अधिक असते. तसेच १० वर्षांच्या खालील ६० टक्के मुलांना पाठ व मणक्याच्या आजाराने ग्रासले आहे. तसेच मुलांच्या आजारांबाबत अनेक डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली आहे. दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी ई क्लास रूमचा पर्याय निवडावा, असेही अहवालात म्हटले आहे.