आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंघोषित गुरू राधे माँ अटकेच्या भीतीने परागंदा, तक्रारदार महिलेमुळे उघड राधे माँच्या रंजक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कौटुंबिक छळाची तक्रार दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने स्वयंघोषित दैवी अवतार राधे माँसह तिच्या सेवेकऱ्यांनी बोरिवली येथील पाचमजली आश्रमातून पळ काढला आहे. राधे माँ ही कोणी संन्यासी नसून ती पती आणि कुटुंबासह राहत असल्याचा खळबळजनक खुलासा निकी गुप्ता या तक्रारदार महिलेने केला आहे.

बोरिवलीच्या निकी गुप्ता यांनी आठवड्याभरापूर्वीच कांदिवली पोलिस ठाण्यात राधे माँसह गुप्ता कुटंुबातील सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. मिठाईचे व्यापारी गुप्ता कुटंुबीय हे राधे माँचे भक्त आहेत. राधे माँच्या आश्रमात सेवेकरी म्हणून राहण्याची कुटुंबीयांनी सक्ती केल्याचे निकी यांनी तक्रारीत म्हटले आहे. सेवेदरम्यान राधे माँने आपल्याला लाथाबुक्क्यांनी तसेच हातातल्या त्रिशुळाने मारहाण केल्याचेही निकी गुप्ता यांचे म्हणणे आहे. तक्रारीचे स्वरूप अतिशय गंभीर असून त्याअंतर्गत राधे माँ हिला अटकही होऊ शकते, अशी माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली आहे. अटकेच्या भीतीनेच राधे माँ हिने मुंबईबाहेर पळ काढला आहे. त्यांच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारावरील रखवालदाराने सध्या इमारतीत कोणीही नसून सर्व जण दिल्लीला गेल्याची माहिती दिली आहे.

टल्ली बाबा माँचा पती?
राधे माँच्या संदर्भात गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती फारच धक्कादायक आणि मनोरंजक आहे. पंजाबच्या होशियारपूर येथील मुकेरिया या गावची कुलविंदर ऊर्फ बब्बो हीच राधे माँ असल्याचा दावा केला जात आहे. राधे माँ ही संन्यासी जीवन जगत असल्याचा दावा तिच्या भक्तांमार्फत केला जात असतो. मात्र, मनमोहन सिंह नावाचा तिचा पती असून तोच राधे माँचा प्रमुख भक्त असलेला टल्ली बाबा असल्याचा संशय आहे. भक्तांच्या दानातून तब्बल एक हजार कोटींपेक्षाही अधिक माया राधे माँने जमा केल्याचा अंदाज आहे.

फिल्मी गाण्यांवर नाचणे हा माँचा छंद
निकी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध फिल्मी गाण्यांवर नाचणे हा राधे माँ हिचा छंद असून एका बंद खोलीत ती हा नाच करत असते. आपण स्वत: हा नाच अनेकदा पाहिला असून त्यामुळे बऱ्याचदा राधे माँ हिने आपल्याला मारहाण केली आहे, असेही निकी गुप्ता यांचे म्हणणे आहे.