आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयचा वर्धापन दिन : शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज द्या - मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मदतीसाठी बँकांना पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे. गरीब आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा बँकांनी प्राधान्याने विचार करावा. त्यांना कर्ज दिल्याने बँका बुडणार नाहीत, असे मोदी म्हणाले.
रिझर्व्ह बँकेला ८० वर्षे झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्जाच्या बोज्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून आपण त्यांच्यापर्यंत बँकांचा विस्ताराचा विचार करू शकत नाही का? आपण हे स्वप्नही पाहू शकत नाही का? गरिबांना मदत केल्यामुळे एखादी बँक बुडेल असे मला अजिबात वाटत नाही, असे मोदी म्हणाले. आर्थिक समावेशनासाठी २० वर्षांचा रोडमॅप तयार करा, असा सल्ला त्यांनी रिझर्व्ह बँकेला दिला.

आरबीआयच्या ८० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन उपस्थित होते.
स्वदेशी कागदावरच नोटा छापा

मोदी म्हणाले, आपल्या नोटांचा कागद व शाईही भारतीयच असावी. जे गांधीजी स्वदेशीसाठी लढले, त्यांचा फोटो विदेशी कागदावर छापत राहणे आपणाला शोभते का? रिझर्व्ह बँकेने पुढाकार घ्यावा. मेक इन इंडियाचा तोच प्रारंभ असेल.
आत्महत्यांनी तुमचे मन हेलावते का?

आपले शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांचे दु:ख वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांपुरतेच मर्यादित राहू नये. शेतकरी मरतात तेव्हा बँकिंग क्षेत्राचे मन हेलावते का? सावकारी कर्जामुळे ते मृत्यूला कवटाळत आहेत. शेतकऱ्यांची दैना पाहून बँकिंग क्षेत्राचेही मन हेलावलेच पाहिजे, असे मोदी म्हणाले.