आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; मुंबईत आमदार आशिष शेलारांच्या घरासमोर राडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निषेधार्थ भाजपने त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून काँग्रेसने बुधवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांच्या घरावर मोर्चा नेला. त्यांना विरोध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. परिणामी दोन्ही गट एकमेकांना भिडले. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

गुरुदास कामत यांचे कट्टर समर्थक राजहंस सिंह, मन्हास यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांनी वांद्र्याच्या रंगशारदा भवनाशेजारील शेलार यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी झाली. काँग्रेस कार्यकर्ते शेलारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पोस्टर्सची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेले भाजप कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांवर तुटून पडले. दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सौम्य लाठीमार करत कार्यकर्त्यांना पांगवले. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी ज्या बसने काँग्रेस कार्यकर्ते आले त्या बसची तोडफोड केली. आजारपणामुळे घरी असलेल्या शेलार यांनी भाजप कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर वातावरणातील तणाव कमी झाला.

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी
मुंबई काँग्रेस ही दोन गटांत विभागली गेल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. याआधी मुरली देवरा आणि गुरुदास कामत असे दोन गट होते. आता कामत व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम असे दोन गट तयार झाले असून बुधवारच्या मोर्चात एनएसयूआय, युवा काँग्रेस तसेच कामत यांना मानणाऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. मात्र, निरुपम यांचा गट या मोर्चात फारसा सक्रिय दिसला नाही.

दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप

गुरुदास कामतांनी माफी मागावी: आशिष शेलार
गुरुदास कामत यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने स्मृती इराणी यांचा अपमान केला आहे. महिलांचा अपमान करण्याची आपली संस्कृती नाही. वांद्र्याच्या मुख्य रस्त्यावर मोर्चा काढून नागरिकांची गैरसोय झाल्याने काँग्रेसने मुंबईकरांची माफी मागावी. ज्या मुद्द्याची चर्चा संसदेत होऊ शकते त्यासाठी मुंबईकरांची गैरसोय करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न मुस्कटदाबीचा : यादव
काँग्रेस कार्यकर्त्यांन आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खरे तर शांतपणे मोर्चा काढला होता, पण भाजप कार्यकर्त्यांनी हिंसक स्वरूप धारण करत आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे पोलिसांनी आमचे म्हणणेही ऐकून घेतले नाही, असा आरोप मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...