आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँवर आणखी एक गुन्हा दाखल, धार्मिक भावना भडकावल्या महिला वकिलाची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धार्मिक भावना भडकावून भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वयंघोषित गुरू राधे माँच्या विरोधात आणखी एक तक्रार बोरिवली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अॅड. फाल्गुनी ब्रह्मभट यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या आधी राधे माँवर कांदिवली पोलिसांत कौटुंबिक छळाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे.

"माता की चौकी'नावाने राधे माँ आपला दरबार भरवते. या माध्यमातून ती भक्तांची फसवणूक करत असल्याचा दावा करत ब्रम्हभट यांनी तक्रार केली आहे. त्यांचे हे कृत्य धार्मिक भावना भडकवणारे असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. राधे माँविरोधात तक्रार आली असून त्यानुसार तपास सुरू केल्याची माहिती परिमंडळ ११ चे उपायुक्त विक्रम देशमाने यांनी दिली.
दरम्यान, आठवड्याभरापूर्वी निक्की गुप्ता या महिलेने राधे माँविरोधात दाखल केलेल्या काैटुंबिक छळाच्या तक्रारीनुसार तिच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिस निरिक्षक मुकूंद पवार यांनी दिली. मात्र, अद्याप तिच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फिर्यादींकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने जबाब नोंदवण्यास वेळ लागत असला तरी आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण करून कारवाई केली जाणार असल्याचेही पवार म्हणाले. या प्रकरणात राधे माँ ही सातव्या क्रमांकाची आरोपी आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यापासून राधे माँ परागंदा झाल्याची माहिती असून त्यांचा दरबारही सध्या बंद असल्याचे सांगितले जाते.