आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issues Which Could Haunt Congress NCP In Assembly Election

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडणार वाढीव दहा जागा! मायावती-आंबेडकरांना सोबत घेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘आघाडीतील 144 जागा द्या, अन्यथा स्वबळावर लढू’ असे धमकीवजा इशारे देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे दबावतंत्र यशस्वी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस या सत्ताधारी पक्षांत पुन्हा आघाडी होईल. एवढेच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीत पानिपत झालेली काँग्रेस विधानसभेला एक पाऊल मागे घेऊन राष्ट्रवादीला वाढीव जागा देऊ शकते,’ असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या संकेतांवरून राष्ट्रवादीला किमान दहा जागा वाढवून मिळू शकतात, असा निष्कर्ष सध्या तरी काढला जाऊ शकतो.
‘2009 पासून किमान 40 जागांवर काँग्रेसचा सतत पराभव झाला आहे. या जागांपैकी काही जागा राष्ट्रवादीला दिल्या जाऊ शकतात. राष्ट्रवादीचाही काही जागांवर असाच पराभव झालेला आहे. त्या जागाही आम्ही मागू शकतो. अर्थात पराभवामागील कारणे, त्या मतदारसंघातील नव्या नेतृत्वाचा उदय, ताजी राजकीय परिस्थिती या घटकांचा विचार करून हा निर्णय घेतला जाऊ शकतो,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगत वरील माहितीला एकप्रकारे पुष्टीच दिली आहे.
चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी काही निवडक पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. ते म्हणाले की, ‘2004 मध्ये राष्ट्रवादीला विधानसभेच्या 124 जागा देण्यात आल्या होत्या. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीतील निकालाचा निकष लावून काँग्रेसने विधानसभेला राष्ट्रवादीच्या दहा जागा कमी केल्या आणि त्यांना 114 जागा दिल्या. 2009 मधील विधानसभेच्या जागा लक्षात घेऊन लोकसभेचे जागावाटप करावे आणि काँग्रेसला 2009 च्या 26 ऐवजी किमान 29 जागा मिळाव्यात, अशी आमची भूमिका होती. मात्र, राष्ट्रवादीने ती मान्य केली नाही आणि अखेर 2014 च्या लोकसभेला 26 : 22 चे सूत्र कायम राहिले. कोल्हापूरची तर जागा आमचीच होती, तरीही राष्ट्रवादीला आम्ही दिली. 2014 मध्ये हे सारे घटक लक्षात घेऊन आम्ही विधानसभेला तडजोड करायला तयार आहोत. मात्र, ही तडजोड सन्मानजनक असायला हवी,’ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला जनता स्वीकारणार नाही
भाजप सध्या तरी कुणालाही मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याच्या मानसिकतेत नाही. जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेनेला जादा जागा मिळत असल्याने त्यांचेच आमदार जादा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या जर सत्ता परिवर्तन झाले तर मुख्यमंत्रिपदी शिवसेनेची व्यक्ती बसेल. शिवसेनेच्या हातात राज्याची सत्ता दिली तर काय होते हे महाराष्ट्राने 1995 ते 1999 या काळात अनुभवले आहे. त्यामुळे राज्यातील जनता भाजप-शिवसेना महायुतीला सत्तेत बसवणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

बेकीने नव्हे, एकीनेच लढणार
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे सध्या टोकाची वक्तव्ये केली जात असली तरी विधानसभेला दोन्ही पक्षांची आघाडी होईल. आघाडीपूर्वी अशी वक्तव्ये नेहमीच होत असतात. दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पातळीवर जागावाटपाचे सूत्र निश्चित होईल. एकदा अशी आघाडी झाली की माझ्याच नेतृत्वात राज्यात निवडणूक लढली जाईल, असे मुख्यमंत्री चव्हाणांनी सांगितले. शरद पवारांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्याच्या चर्चेला यामुळे आता पूर्णविराम मिळाला आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळले पाहिजे, ही काँग्रेसची ठाम भूमिका असल्याचा पुनरुच्चर त्यांनी केला.

हिंदुत्वावर निवडणूक जिंकण्याचे डावपेच
केंद्रात मोदींचे सरकार सत्तेत आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानसिकतेतील हिंदुत्वाने उचल खाल्ली आहे. देशात घडणार्‍या अनेक घटना प्रत्यक्ष संघ स्वयंसेवकांनी केल्या नसल्या तरी या विचाराची सत्ता असल्याने बळ मिळालेल्या लोकांनी त्या केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना धर्माच्या नावावर असे ध्रुवीकरण करू शकते. लोकसभा निवडणुकीतही असे ध्रुवीकरण करण्यात आले, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

महायुतीला आव्हान महाआघाडीचे
महायुतीमुळे भाजप-शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत लाभ झाला. हे लक्षात घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बहुजन समाज पक्ष, प्रकाश आंबेडकरांचा भारिप- बहुजन महासंघ यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी कबूल केले. ही महाआघाडी महायुतीला तगडे आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते.

‘नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द पक्षश्रेष्ठींनी दिलाच नव्हता’
०काँग्रेसश्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता, असा दावा नारायण राणे करत असले, तरी ‘पक्षश्रेष्ठींनी असा कोणताही शब्द दिला नव्हता,’ असे स्पष्टीकरण देत मुख्यमंत्र्यांनी राणेंचा दावा खोडून काढला. ‘राणेंच्या राजीनाम्याबाबत सध्या तरी काहीही निर्णय घेणार नाही,’ असे ठामपणे सांगितले.
० ‘नऊ वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, असे राणेंचे म्हणणे आहे; परंतु माझ्याकडे तरी अशी माहिती नाही. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या वेळेस मी दिल्लीतच होतो आणि या प्रक्रियेचा एक भागही होतो. आताही त्यांची मागणी मुख्यमंत्रिपदाचीच आहे,’ असेही चव्हाणांनी नमूद केले.

० ‘आपल्याविरुद्ध तलवार परजणारे राणे यांनी हल्ला मात्र उद्धव ठाकरेंवर का चढवला. तुम्ही नेमके राणेंने शांत कसे केले?’ या प्रश्नावर मिश्कील हसत ‘हे गुपित उघड करणे शक्य नाही’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अधिक बोलणे टाळले.
० ‘लोकसभा निवडणुकीचा निकाल येत होता तेव्हाच राणेंनी माझ्याकडे राजीनामा पाठवला. ते उद्विग्न झाले होते. मी त्यांना समजावले की ‘ही लाट यूपीएविरुद्ध आहे.’ आता पुन्हा त्यांनी राजीनामा दिलाय. तो माझ्याकडेच आहे. त्याचे पुढे काय करायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मी तरी याबद्दल काहीही निर्णय घेणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.