आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ शस्त्रसाठा प्रकरण: जबीसह अाराेपींना गुन्ह्याचा तिळमात्र पश्चात्ताप नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळजवळ जप्त करण्यात अालेल्या शस्त्रसाठाप्रकरणी विशेष मकाेका न्यायालयाने जबिउद्दीन अन्सारीसह सात अाराेपींना अाजन्म कारावासाची शिक्षा मंगळवारी ठाेठावली, तर इतर पाच जणांनाही अाठ ते १४ वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली अाहे. हा जनसामान्यांचा निकाल असून तो एक मैलाचा दगड ठरेल,’ असा विश्वास न्यायमूर्ती श्रीकांत अणेकर यांनी शिक्षा ठोठावण्यापूर्वी व्यक्त केला. या प्रकरणाचे गांभीर्य मोठे आहे, मात्र या प्रकरणातील दोषींना आपल्या कृत्याचा तिळमात्र पश्चात्ताप होत नसल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले.
शस्त्रसाठाप्रकरणी आलेला निकाल हा जनसामान्यांचा प्रयत्नांतून साकारल्याचा उल्लेख करत न्यायामूर्ती अणेकर म्हणाले की, ‘या प्रकरणातील एकूण साक्षीदारांपैकी जवळपास ६५ साक्षीदार हे स्वत:हून आपल्याकडे असलेली माहिती देण्यासाठी तपास यंत्रणांकडे आले. विशेष म्हणजे हे सर्व साक्षीदार विविध जाती-धर्माचे होते. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे तपास यंत्रणांना इतका मोठा गुन्हा उघडकीस आणता आला. त्यामुळे हा निकाल खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा आहे आणि म्हणूनच तो मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही, असेही न्यायालयाने आवर्जून नमूद केले.
मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास न्या. अणेकर हे आपल्या स्थानावर स्थानापन्न झाले आणि त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. या वेळी त्यांनी या एकूणच प्रकरणाबाबतची काही निरीक्षणे नोंदवली. ते म्हणाले की, ‘या प्रकरणात जप्त झालेल्या शस्त्रास्त्रांचा आणि स्फोटकांचा जर वापर झाला असता तर समाजाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले असते यात शंका नाही. मात्र, त्याबाबतचा कोणताही पश्चात्ताप आरोपींना होत नसल्याचेही ते म्हणाले. जिहादच्या नावाखाली दहशत पसरवण्यासाठी आखलेला हा कट असल्याचे मतही न्यायालयाने या वेळी नोंदवले आहे.
उच्च न्यायालयात दाद मागणार : अॅड. खान
औरंगाबाद शस्त्रसाठाप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्व अारोपींनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना आरोपींचे वकील वहाब खान म्हणाले की, आरोपींच्या सहभागाबाबतचा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले आहे. तपास यंत्रणांनी सादर केलेले सर्व पुरावे वरवरचे असून वरच्या न्यायालयात ते अजिबात टिकणार नाहीत. येत्या पाच ऑगस्ट रोजी संपूर्ण निकालपत्र मिळाल्यानंतर या निकालाविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले.
मकाेकाच्या कलमान्वये शिक्षा तपास अधिकाऱ्यांचा दावा
आरोपींच्या विरोधात सादर केलेले पुरावे दोषसिद्धीसाठी पुरेसे असले तरीही ते मकाेका लावण्याइतपत पुरेसे पुरावे नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. मात्र, शिक्षा सुनावताना मंगळवारी न्यायालयाने मकाेका कायद्याच्या कलम १८ अंतर्गत मोहंमद अमीर शकील, सय्यद अकिफ जफरुद्दीन आणि फैजल अताऊर रहमान यांनी दिलेले जबाब ग्राह्य धरल्याने आपला तपास योग्य होता हेच सिद्ध झाल्याचे मत या प्रकरणाच्या तपास पथकात असलेल्या वसंत ताजणे आणि सुनील देशमुख या दोन अधिकाऱ्यांनी न्यायालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. तसेच एक मोठा कट तडीस नेण्यापूर्वीच उधळल्याचे सांगत निकालाबद्दल या दोघांनी समाधान व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...