आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jadoo Tona Bill Passing In Winter Session At Any Cost cm

जादूटोणा विधेयक हिवाळी अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत मंजूर करणार- मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जादूटोणा विरोधी कायदा राज्यात लागू करण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश जारी केला असून हा कायदा नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूर करुन या अध्‍यादेशाचे रुपांतर कायद्यात करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
यशवंतराव प्रतिष्ठान कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम, मुंबई व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मलून समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जादूटोणा विरोधी अध्यादेशावर परिसंवाद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी न्यायमूती चंद्रशेखर धर्माधिकारी, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, म. बा. पवार, तसेच ॲङ निलेश पावसकर, मुक्ता दाभोळकर, विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी मंत्रिमंडळाने या कायद्याच्या मसुद्याला मान्यता दिली हा पहिला टप्पा ठरला. त्यानंतर हा कायदा लागू होण्यासाठी शासनाने अध्यादेश जारी केला असून राज्यात या कायद्या अंतर्गत काही ठिकाणी गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आलेले आहेत. या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याशी विचार विनिमय करण्यात येत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करण्यास शासन कटिबध्द असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षता अधिकारी नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. हा कायदा पारित केल्यामुळे विकसनशील देशामध्ये एक आदर्श निर्माण होईल. इतर राज्यात आणि देशात या कायद्याची अंमलबजावणी करणे सोपे होईल. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता सुध्दा महत्वाची आहे. समाजात विज्ञानाधिष्टीत दृष्टीकोन निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले की, कुठलाही कायदा हा समाज परिवर्तनाचा मार्ग मोकळा करतो. लोकशाहीत परिवर्तन हवे असेल तर आपल्याला कायद्याचे राज्य हवे आहे. नवपरिवर्तन समाज निर्माण करायचा असेल तर शोषणाच्या मार्गाच्या मुळाशी जाऊन विचार करुन शोषणाविरुध्द लढाई केली पाहिजे असे सांगून अंधश्रध्देला महिला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. विश्वास, श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक ओळखला पाहिजे.सामाजिक गुन्हे आणि व्यक्तीगत गुन्हे यामध्ये फरक केला पाहिजे. समाजातील हे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.