मुंबई - ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही. आम्ही काय करावे आणि काय करू नये हे आम्हाला या जैनांनी शिकवू नये,’, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला फटकारले आहे. अशा प्रत्येक गोष्टीचा हे भाजपवाले
आपल्या राजकारणासाठी उपयोग करत असून मोदींच्या जीवावर सध्या हे एवढ्या उड्या मारत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. सध्या मुंबई, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मधील मांस विक्री बंदीच्या वादाला भाजपनेच हवा दिल्याचा आरोप करत यापुढे शहरात बंदीच्या दिवशी मांसविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना मनसेचे कार्यकर्ते संरक्षण देतील अशी घोषणाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
पर्युषण पर्वात मांस विक्री बंदीच्या वादात आता राज ठाकरेंनीही उडी घेतली आहे. गुरुवारी सकाळी दादर येथील आगर बाजारात मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी कोंबड्यांची विक्री करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. मात्र हा विक्री स्टॉल अनधिकृत असल्याचे सांगत पोलिसांनी देशपांडे यांच्यासह १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर संध्याकाळी एका बैठकीसाठी रंगशारदा येथे आलेल्या राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
‘विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यानच मी या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती. हे लोक हळुहळू डोकी वर काढणार आणि मग आपल्यावरच बंधने घालणार, मात्र तेव्हा कुणी आपल्यावर विश्वास ठेवला नव्हता. शिवाय हे लोक यांच्या वेगळ्या इमारती बांधणार, त्यात शाकाहारी असलेल्या मराठी माणसांनाही घरे घेऊ देणार नाहीत. पण यापुढे हे चालणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला.
पुढील स्लाइडवर वाचा प्रतिज्ञापत्र देण्याचे हायकोर्टाचे आदेश