मुंबई - जैन पर्युषण पर्वात मांस विक्रीवर बंदीच्या निर्णयामुळे वाद सुरू असतानाच आता जैनधर्मीय ८ दिवसांची मांसबंदी हवीच, या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये जैन धर्मगुरूंनी शनिवारी सभा घेतली. या सभेननंतर १० हजार जैनधर्मीयांनी शांततेत शक्तिप्रदर्शन करत आंदोलन सुरू केले. यापैकी काही जण उपोषणाला बसले आहेत.
पर्युषण काळात मीरा-भाईंदर महानगरपालिकेने मांस विक्रीवर ८ दिवसांची बंदी घालण्याचा िनर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. मीरा-भाईंदरपाठोपाठ मुंबई आणि नवी मुंबई महापािलकेनेही असा निर्णय घेतल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले. भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांनी या निर्णयाचा जोरदार समाचार घेतला. यानंतर ८ दिवसांच्या बंदीचा िनर्णय मागे घेण्यात येऊन फक्त पूर्वीप्रमाणे दोन दिवसांची मांस विक्री बंदी करण्यात आली. आता त्याला जैनधर्मीयांनी विरोध केला आहे.
जैन मुनी आचार्य सागरचंद्र सुरीश्वरजी महाराज म्हणाले, जैन धर्म हा अहिंसेच्या तत्त्वावर आधारलेला अाहे. तथापि, महापालिका मांस विक्री बंदीच्या आपल्याच निर्णयाची अंमलबजावणी करत नसल्याने जैन समाज चकित झाला आहे. मांस विक्री बंदीला विराेध करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनी जैन समाजाला ठेच पोहोचली आहे. मुंबईच्या आर्थिक विकासात जैन धर्मीयांच्या योगदानाकडे राजकारणी दुर्लक्ष करत असल्याचे ते म्हणाले.
आम्हाला राजकारण करायचे नाही : जैन समाज उपाध्यक्ष
आम्हाला राजकारणात रस नाही. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी ते करावे. मात्र मांस विक्री बंदीला िवरोध करणाऱ्यांनी इतर समाजावरही परिणाम होऊ शकतो, याचा िवचार करावा. प्राणिमात्रावर दया करा, असा संदेश जैन धर्म देतो. आपण केलेल्या पापांचे क्षालन करण्याचा हा काळ असून या काळात हत्या करू नका, असेही सांगतो. जैन समाजावर टीका
करणाऱ्या राजकारण्यांनी जैन समाजाची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया जैन समाज उपाध्यक्ष देवेंद्र वखारिया यांनी व्यक्त केली.