आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयप्रभा स्टुडिओचा खरेदी व्यवहार रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओचा मालकी हक्क गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याकडे आहे. या स्टुडिओने अनेक मराठी तारेतारकांचा उदय पाहिला आहे. मात्र, सध्या स्टुडिओ बंद स्थितीत असल्याने तो विकण्याची तयारी लता मंगेशकर यांनी केली होती. कोल्हापूरकरांची निदर्शने आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तींच्या विरोधामुळे जयप्रभा स्टुडिओ खरेदी करण्याची इच्छा बाळगणारे बिल्डर पोपटलाल गुंदेशा यांनी हा व्यवहार रद्द केल्याची घोषणा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केली.
महाराष्ट्र शासनाच्या क वर्ग हेरिटेज यादीत समाविष्ट झालेल्या जयप्रभा स्टुडिओला धक्काही लागणार नाही. असे वचन देऊन आजूबाजूची सात एकर मोकळी जागा विकणार असल्याचे सांगणार्‍या लता मंगेशकर यांनी हा स्टुडिओही विकण्याचा घाट घातला होता. या विरुद्ध सिनेवर्तुळातील नामवंत तार्‍यांसह, कोल्हापुरकरांनीही निषेध व्यक्त करत जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी मोर्चा काढला. त्यानंतर जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन स्टुडिओचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहण्यासाठी हा खरेदी व्यवहार रद्द करत असल्याच्या आशयाचे पत्र गुंदेशा यांनी मराठी चित्रपट महामंडळाकडे सुपूर्द केले. हा स्टुडिओ महाराष्ट्र शासनाने विकत घ्यावा असे आवाहन चित्रपटसृष्टीचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी केले आहे.