आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- आदर्श सोसायटी घोटाळ्यातील सात आरोपींना जामीन मिळाल्यानंतर आता मुंबईचे माजी महापालिका आयुक्त जयराज फाटक व राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त रामानंद तिवारी या उर्वरित दोन आरोपींनीही जामिनासाठी विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली आहे.
आदर्श सोसायटी प्रकरणी 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यास सीबीआय अपयशी ठरल्यामुळे आपण जामिनास पात्र ठरतो, असा दावा त्यांनी आपल्या जामीनअर्जात केला आहे. 3 जून रोजी त्यांच्या सीबीआय कोठडीला 60 दिवस पूर्ण झाले.29 मे रोजी सोसायटीचे मुख्य प्रवर्तक व माजी आमदार कन्हैयालाल गिडवानी, मुंबईचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप व्यास, नगरविकास विभागाचे माजी उपसचिव प्रभाकर देशमुख, सोसायटीचे प्रवर्तक निवृत्त ब्रिगेडियर एम. एम. वांच्छू, निवृत्त मेजर जनरल टी. के. कौल व ए. आर. कुमार आणि निवृत्त डिफेन्स इस्टेट आॅफिसर आर. सी. ठाकूर यांना न्यायाधीश मा. वि. कुलकर्णी यांनी जामीन मंजूर केला होता.
या प्रकरणी 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यास सीबीआयला अपयश आल्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती या 7 जणांनी न्यायालयाला केली होती. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरत न्यायालयाने प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. या आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा व भारतीय दंडसंहितेतील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.