आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जकात नाके दलालांच्या विळख्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जकात नाक्यांवरील बोगस पावत्या रोखण्यासाठी पालिकेने वेब पोर्टल सुरू केले असून जकात पावतीची शहानिशा करण्याची जबाबदारी जकात भरणा-यावरच टाकली आहे. दहिसर, मुलुंड, ऐरोली, वाशी असे बृहन्मुंबईचे मुख्य पाच जकात नाके असून 65 जकात संकलन केंद्रे आहेत. तसेच समुद्रमार्गे आणि रेल्वेनेव्दारे येणा-या मालाची मोठी जकात पालिकेस मिळत असते. मुंबईतील जकात नाक्याचे खासगीकरण करण्यात आलेले नसून पालिकेचे कर्मचारीच जकात वसुलीचे काम पाहतात.
जकात नाक्यांवर बनावट पावत्या सर्रास दिल्या जात असल्याचे बोलले जाते. तसेच कमी किंमतीचा माल दाखवून ट्रक्स जकातनाक्याबाहेर काढून देणारे दलालांचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप पालिका सभागृहात विरोधकांकडून गेली अनेक वर्षे करण्यात येतो आहे. त्यामुळे मध्यंतरी पालिकेने सर्व जकात नाक्यांवर स्कॅनर आणि सीसीटीव्ही बसवण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात खास तरतूदही करण्यात आली होती; परंतु जकात नाक्यावर अद्याप स्कॅनर बसविलेले नाहीत. जकात नाक्यावर दिल्या जाणा-या बोगस पावत्यांना चाप बसविण्यासाठी पालिकेने आता एक वेब पोर्टल सुरू केले आहे. जकातदारास जकात अदा करताना पावती बनावट नसल्याची या पोर्टलवरती येऊन खात्री करण्याचे पालिकेने आवाहन केले आहे. बनावट पावतीव्दारे जकात भरल्यास, तो माल विनाजकातीचा समजून दंडास पात्र राहणार आहे.
जकात नाक्यावर शेकडो वाहनांच्या रांगा असतात. घाईगडबडीत जकात पावत्यांची खातरजमा करण्यासाठी जकातदार नाखुश असतात. त्यामुळे बनावट पावत्या रोखण्यासाठी बनविलेल्या पोर्टलमुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडण्याची शक्यता कमीच आहे.