आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Mns District President Lalit Kolhe Resign, May Join In Bjp

जळगावचे मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हेंचा राजीनामा, भाजपच्या वाटेवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- जळगाव मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी टीम मनसेसह एकनाथ खडसे यांचा अजिंठा विश्रामगृहावर आशिर्वाद घेतला होता)
मुंबई- जळगाव मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मनसेने जोरदार आपटीबार झाल्याने राज्यातील ठिकठिकाणीचे पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठी देत आहेत. प्रदेश सरचिटणीस प्रविण दरेकर, वसंत गिते, अतुल चांडक यांच्यासह नाशिकचे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामे दिले होते. राज ठाकरेंनी ज्यांनी ज्यांनी आपणाकडे राजीनामे दिले आहेत त्या सर्वांचे स्वीकारत असल्याचे जाहीर केले आहे. अशा काळात आपल्यासोबत कोण कोण आहे अशी मिश्किल टिप्पणीही राज यांनी केली आहे. आता जळगावच्या टीम मनसेनेही राजीनामे दिले आहेत. कोल्हे यांच्यासह सुमारे 50 पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान, या सर्वांनी आपण फक्त पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षाचे सदस्य म्हणून आपण काम करणार असल्याचे म्हटले आहे.
कोल्हे भाजपच्या वाटेवर, मंगळवारी खडसेंच्या पडले होते पाया- विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका सहन केल्यावर खचलेल्या टीम मनसेने भाजपच्या तंबूत जाण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे. राज्याचे महसूल मंत्रिपद मिळाल्यावर एकनाथ खडसे मंगळवारी प्रथमच जळगाव दौऱ्यावर आले होते. या वेळी विश्रामगृहावर मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांच्यासह मनसे नगरसेवकांनी हजेरी लावून खडसे यांचे आशीर्वाद घेतले. मनसे नगरसेवकांची ही भेट नव्या राजकीय बदलाची द्योतक मानले जात आहे.

सुरेशदादा जैनांची पालिकेतील सत्ता खेचण्यासाठीच खडसेंची खेळी- विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड दिल्यानंतर पालिकेच्या सत्तेवरूनही जैन गटाला पायउतार करण्याच्या दृष्टीने राजकय हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिका निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था असताना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मनसे राष्ट्रवादी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असल्याने हे तिघे पक्ष एकत्र येऊ शकले नव्हते. आता निवडणूक आटोपली असून राजकीय समीकरणेही बदलली आहेत. निवडणुकीतील पराभवामुळे खचलेल्या मनसेने वेगळा मार्ग निवडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महसूल मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जळगावात आलेल्या एकनाथ खडसे यांच्या आशीर्वादासाठी मनसेच्या शहरातील संपूर्ण टीमने विश्रामगृह गाठले होते. या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी खडसेंचे आशीर्वाद घेतले. या वेळी त्यांच्या मातोश्री नगरसेविका सिंधू कोल्हे, नगरसेवक मिलिंद सोनवणे, पद्मा सोनवणे, पार्वता भील, नितीन ननवरे, मंगला चौधरी अनंत जोशी हे मनसेचे नगरसेवकही उपस्थित होते.
जातीय आणि बदललेली राजकीय समीकरणे पाहता कोल्हे कुटुंबीयांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भाजपशी जवळीक हाच एकमेव मार्ग उरला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी तपासून पालिकेतील मनसेचा मोठा गट फुटून स्वतंत्र आघाडीची स्थापना करू शकतो, नंतर हा गट निर्णय घेण्यास स्वतंत्र असेल. खाविआच्या तिकिटावर निवडून आलेले चंद्रकांत सोनवणे भाजपचे सुरेश भोळे विधानसभेत गेल्याने दोन जागा रिक्त झाल्या आहेत. सद्य:स्थितीत खाविआचे 32 नगरसेवक आहेत. जनक्रांतीच्या 2 व राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी त्यांना यापूर्वी पाठिंबा दिला होता. दोघांच्या पाठिंब्याने खाविआ सत्तेत आहे.
पालिकेतील पक्षीय बलाबल असे आहे...
32- खान्देश विकास आघाडी
14- भाजप
12- मनसे
11-राष्ट्रवादी
2- जनक्रांती
1- मविआ
1- अपक्ष
2 जागी पोटनिवडणक होणे बाकी.