आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार योजना आमूलाग्र बदल घडविणारी, ती कल्पकतेने पूर्ण करा- फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारा आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देणारा जलयुक्त शिवार अभियान हा सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्याच्या यशस्वीतेसाठी जास्तीत जास्त कल्पकता वापरून तो कालमर्यादेत पूर्ण करावा. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी वाढवून या अभियानाच्या कामावर नियंत्रण ठेवावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे सुरू असलेले काम समाधानकारक आहे. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेत कल्पकतेने चांगले काम केले आहे, त्यांच्याप्रमाणे अन्य जिल्ह्यातही योजनेचे काम यशस्वीरित्या पूर्ण करावे. विभागीय आयुक्तांनी या सर्व कामांचे योग्य सनियंत्रण करावे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटी वाढवून योजनेच्या कामाला गती द्यावी. या योजनेच्या कामाचा अहवाल प्रत्यक्ष कामांच्या भेटीवर आधारित असावा. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार, राजेंद्रसिंह यांसारख्या जलक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या आणि अभ्यास असलेल्या तज्ज्ञांना आपल्या जिल्ह्यात आमंत्रित करावे.
जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती देण्यासाठी मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागात जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत अतिरिक्त जेसीबी यंत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या योजनेच्या कामांसाठी असलेली कालमर्यादा व योजनेचे महत्त्व समजून कामांना गती द्यावी. तसेच योजनेच्या यशस्वीतेसाठी जनजागृती आणि प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
ज्या जिल्ह्यांची खरीप हंगाम आढावा बैठक अद्याप झालेली नाही त्यांनी ती तातडीने आयोजित करावी. खरीप हंगामाची राज्यस्तरीय बैठक 17 किंवा 18 मे रोजी घेण्यात येईल. नियोजन करण्याच्या दृष्टीने त्यापूर्वी सर्व जिल्ह्यांची टिपणी झाली पाहिजे. केवळ औपचारिकता म्हणून जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक घेऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बजावले. जिल्हास्तरावरील मान्सूनपूर्व आढावा बैठक मे महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्यात यावी, अशा सूचना देऊन मुख्यमंत्र्यांनी खरीप हंगाम 2014 मधील शेतकऱ्यांच्या देण्यात आलेल्या मदतीचा आढावा घेतला.
बातम्या आणखी आहेत...