आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- मुंबई शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज नवी दिल्लीत याबाबत घोषणा केली.
गेल्या 14 महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची घोषणा ब-याच दिवसापासून प्रलंबित होती. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी राजीनामा दिला होता. अखेर त्याची घोषणा आज करण्यात आली. भाई जगताप, मधू चव्हाण व जनार्दन चांदूरकर या तिघांची नावे चर्चेत होती. चांदूरकर यांच्याबरोबर चंद्रकांत हांडोरे आणि एकनाथ गायकवाड या दलित नेत्यांची नावेही चर्चेत होती. मात्र कोणत्याही गटा-तटात विभागले गेले नसलेले चांदूरकर यांच्या पदरात श्रेष्ठींनी माप टाकल्याचे दिसून येते. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी मुंबईतील सर्व गटाशी चर्चा केल्यानंतर चांदूरकर यांचे नाव दिल्लीकडे पाठविले होते. चांदूरकर हे चांगले वकील असून मितभाषी अशी त्यांची ओळख आहे.
राहुल गांधी यांनी स्वत: मुंबईत कार्यकर्त्यांशी तसेच मुंबईतील तीन मंत्री सुरेश शेट्टी, वर्षा गायकवाड व नसीम खान यांच्याशी चर्चा केली होती. मुंबई काँग्रेसमध्ये मुरली देवरा व गुरुदास कामत यांचे गट सर्वात शक्तिशाली समजले जातात. तसेच याआधीचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांना मानणार्याही काही कार्यकर्त्यांचा गट आहे. मुंबईतील सर्व प्रमुख आमदार, खासदार व कार्यकर्ते या गटांमध्येच विभागले गेल्याने कुठल्याही गटाकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिल्यास दुसरा गट त्याच्या विरोधात राजकीय कट कारस्थाने सुरू करतो. त्यामुळे दिल्लीच्या डोक्यालाही ताप झालेल्या या पदासाठी कुठल्याही गटात नसलेले व कोणत्याही वादात न अडकलेल्या चांदूरकर यांच्या नावाला दिल्लीकरांनीही पसंती दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.