मुंबई - महाराष्ट्रात येणाऱ्या जपानच्या कंपन्यांच्या सुविधेसाठी एक खिडकी योजनेप्रमाणे जपान डेस्क स्थापणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोकियो येथे शुक्रवारी केली. अजिंठा, लोणार येथे पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा उभारणीस जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीने (जिका) अनुकूलता दर्शवली आहे. अहमदाबाद ते मुंबई ही प्रस्तावित बुलेट ट्रेन नाशिक मार्गे नेण्याच्या प्रस्तावावर विचार करू, असे जिकाने म्हटले आहे. सुपा येथे जपानी इंडस्ट्रियल पार्क उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे टोकियो येथे आयोजित "इन्व्हेस्टिंग इन महाराष्ट्र' या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सुपा येथे औद्योगिक पार्क : जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जेट्रो) मदतीने सुपा (जि.नगर) येथे जपानी इंडस्ट्रियल पार्क उभारण्याचा विचार आहे.
बुलेट ट्रेन नाशिकहून नेणार : अहमदाबाद ते मुंबई ही प्रस्तावित बुलेट ट्रेन नाशिक मार्गाने नेण्याबाबतच्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी जिकाने अनुकूलता दर्शवली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अजिंठा, लोणार पर्यटन स्थळ विकास
अजिंठा लेणी आणि लोणार सरोवर या पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा उभारणीत सहकार्य करण्याचे आश्वासन जिकाने दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.