मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे गावात झालेल्या दलित हत्याकांडाच्या तपासासंदर्भात पोलिसांना आठवड्याची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
आंबेडकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
जवखेडे प्रकरणाचा तपास दाभोलकर प्रकरणाप्रमाणे होऊ देऊ नका, अशी
आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. भाजप सरकार अशा घटनांबाबत अत्यंत संवेदनशील आहे. जवखेडे हत्याकांड अतिशय नियोजनपूर्वक घडवलेले आहे. या प्रकरणाचे काही धागेदोरे तपास करणा-या विशेष पथकाच्या हाती लागलेले आहेत. काही संशयितांना अटकही झालेली आहे,
असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे आंबेडकर म्हणाले.
शपथविधी घटनाबाह्य
नव्या आमदारांना शपथ देण्यापूर्वीच पहिली विधानसभा भंग करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या वैधानिक तरतुदी ब्रेकडाऊन झाल्या आहेत. राज्यपालांनी राज्यघटनेच्या १६४ (२) कलमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे नव्या आमदारांचा सोमवारी होणारा शपथविधी घटनाबाह्य असल्याचा आरोप अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.