मुंबई - जवखेडेतील दलित हत्याकांडानंतर राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. या तणावाच्या स्थितीचा फायदा घेत नक्षलवादी राज्यात दंगली भडकवण्याचा कट रचत असल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सत्ता हाती घेताच राज्यात नक्षल प्रादुर्भावाला लगाम घालून कायदा व सुव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे आहे. गृह खाते स्वत:कडे ठेवल्याने त्यांना या प्रकरणात वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे लागेल. खुद्द पोलिस महासंचालक संजीव दयाल यांनी अनेक संघटना तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतील, असे सूचक वक्तव्य केले. अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथे २० ऑक्टोबरला निर्घृण हत्याकांडात तीन दलितांची हत्या करण्यात आली होती. अद्याप त्यामागील आरोपींचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे राज्यात संतापाची तीव्र लाट उसळलेली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले असून दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या प्रक्षुब्ध वातावरणाचा फायदा घेण्यासाठी नक्षलवादी संघटनांकडून राज्यात जातीय तणाव व हिंसक कारवाया करण्यासाठी तरुणांना भडकावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणाची माहिती घेण्यास जी सत्यशोधन समिती गेली होती त्यात काही नक्षली प्रवृत्तींचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. नक्षल्यांकडून सोशल नेटवर्किंग व मेसेंजर अॅपवर छिन्नविछिन्न मृतदेहांची छायाचित्रेही टाकली जात आहेत.
हत्याकांडाचा तपास करणा-या स्पेशल टास्क फोर्सचे नेतृत्व करणारे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक प्रवीण साळुंखे रविवारी म्हणाले, हत्याकांडाचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. या प्रकरणी मालमत्तेचा वाद, वैयक्तिक वैमनस्य, अनैतिक संबंधांसह अनेक दृष्टीकोनातून तपास केला जात आहे.