आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘१७ डिसेंबरपर्यंत जायकवाडी धरणात पाणी सोडणार नाही’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई; नाशिक आणि अहमदनगर भागातल्या धरणातील बारा टीएमसी पाण्यापैकी उर्वरित अडीच टीएमसी पाणी येत्या १७ डिसेंबरपर्यंत सोडणार नसल्याची हमी राज्य सरकारने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
जायकवाडीत फक्त पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असतानाही ते सिंचनासाठी वापरल्याचे पुरावे शुक्रवारी प्रवरा सहकारी साखर कारखान्याने सादर केले. आजवर जायकवाडीत सोडलेले नऊ टीएमसी पाणी पिण्यासाठी पुरेसे असल्याने अधिक पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही नाशिक आणि अहमदनगरच्या याचिकाकर्त्यांनी केली. राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १७ ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याचा दिलेला निर्णय न्यायालयाने कायम ठेवला होता. मात्र या प्रकरणात इतरही अनेकांनी याचिका दाखल केल्याने त्या सर्व याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी डिसेंबर महिन्यात नव्याने सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
न्यायालयाच्या आदेशानंतर प्राधिकरणाने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावेळी नगर आणि नाशिक मधील याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला होता.

नऊ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडल्यानंतर उर्वरित २.४४ टीएमसी पाणी भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सोडण्यात येणार होते. मात्र आतापर्यंत सोडलेले पाणी मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी पुरेसे असून वरच्या भागातील लोकांचीही पाण्याची गरज लक्षात घेता किमान उर्वरित पाणी सोडण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी प्रवरा सहकारी कारखान्याच्या वतीने अॅड. नितिन घोरपडे यांनी केली. तसेच जाकवाडीत सोडलेले पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही या पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यात येत असल्याची छायाचित्रेही आज न्यायालयात सादर करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...