आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम खात्याचे वाभाडे, माजी सचिवांच्या कारभाराचा वाचला विधानसभेत पाढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराची पाेलखोल केली. बढत्या, बदल्या अाणि निलंबनाच्या विविध प्रकरणांचे दाखले देत त्यांनी कुलकर्णी यांचे अक्षरश: वाभाडे काढले. मात्र संबंधित खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाटील यांचे सर्व अाराेप फेटाळत कुलकर्णींना क्लीन चीट दिली.

अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणात जयंत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकेका अधिकाऱ्याची फक्त तीन महिन्यांच्या कालावधीत तीनदा बदली केल्याचे उदाहरण देत त्यांनी पदोन्नतीमधील घोटाळ्यांवरही बोट ठेवले. रिक्त पदे उपलब्ध नसतानाही आपल्या मर्जीतील हजारो अधिकाऱ्यांना कुलकर्णींनी पदोन्नती दिल्याचे ते म्हणाले. तसेच एका निलंबित केलेल्या अधिकाऱ्याला कोणतीही चौकशी न करता अवघ्या दीड महिन्यांत पुन्हा सेवेत घेण्याबाबत त्यांनी घेतलेल्या निर्णयामागील गौडबंगाल नेमके काय आहे?, असा सवाल करत त्यांनी संबंधित मंत्र्यांची चांगलीच अडचण केली. एकूणच कुलकर्णी यांच्या या सर्व कारभाराची चौकशी करायला हवी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

सचिव कुलकर्णींची मंत्र्यांकडून पाठराखण
या चर्चेच्या उत्तरादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आनंद कुलकर्णी यांची पाठराखण करत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. सार्वजनिक बांधकाम खात्यात गेली पंधरा वर्षे रेंगाळलेला पदांचा अनुशेष दूर केला असून त्या माध्यमातून अकराशे जणांना पदोन्नती आणि १५०० जणांच्या बदल्या करण्यात आल्याचे मंत्री म्हणाले. त्यामुळे हा कुलकर्णींचा निर्णय नसून या प्रकरणांमध्ये कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.