मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी 2001 ते 2009 या कालावधीत महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन लॉटरी विभागात तब्बल अडीच ते तीन लाख कोटींचा महाघोटाळा केल्याचा दावा माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्यासमवेत ऑनलाईन लॉटरी विभागाच्या तत्कालीन संचालिका कविता गुप्ता यांचाही या घोटाळ्यात हात असा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. याबाबत एसीबीने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कुलकर्णी यांच्या आरोपानंतर जयंत पाटील यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, आनंद कुलकर्णी यांच्या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्यामागे घोटाळ्याचा व चौकशीचा ससेमीरा लागणार आहे.
माजी सनदी अधिकारी राहिलेल्या आनंद कुलकर्णी यांनी आज एका वृत्तवाहिनीवर बोलताना जयंत पाटील यांच्यासह ऑनलाईन लॉटरी विभागाच्या कविता गुप्ता या महिला अधिका-यांवर आरोप केले आहेत. कुलकर्णी म्हणाले, 2001 ते 2009 या काळात जयंत पाटील अर्थमंत्री होते. त्यांच्या खात्याच्या अखत्यारीत ऑनलाईन लॉटरी विभाग येतो. या विभागाच्या संचालिका कविता गुप्ता यांना हाताला धरून जयंत पाटील यांनी एका खासगी कंपनीच्या फायद्यासाठी राज्य सरकारचा वर्षाला 25 ते 30 हजार कोटींचा महसूल बुडविला. हा प्रकार 9 वर्षे सुरु राहिला. या सर्व कालावधीत कविता गुप्ता याच ऑनलाईन लॉटरी विभागात संचालिका म्हणून कार्यरत राहिल्या. जयंत पाटील यांच्या आशीर्वादामुळेच त्या इतक्या वर्षे एकाच पदावर चिकटून राहिल्या. या काळात महाराष्ट्र सरकारचे सुमारे अडीच ते तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात जयंत पाटील यांना लाखो कोटींचा फायदा झाल्याची शक्यता आहे. कविता गुप्ता यांनाही यातून मोठा आर्थिक फायदा मिळवला आहे असा आरोप कुलकर्णी यांनी केला.
राज्य सरकारच्या महसूलाची बुड होत असल्याचे लक्षात येताच याबाबत गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली होती. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी याबाबत सीआयडीची चौकशीचे आदेश दिले होते. सीआयडीच्या महासंचालकांनी चौकशी करून याबाबतचा अहवाल सरकारला दिला होता. मात्र, तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी हा अहवाल दाबून टाकत घोटाळेबाजांना पाठीशी घातल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला. दरम्यान, कुलकर्णी यांच्या आरोपानंतर जयंत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.
पुढे वाचा, काय आहे ऑनलाईन लॉटरी प्रकरण आणि कसा घोटाळा झाल्याचा आहे आरोप...