आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jewellers Finish For Industrialists In Country Rahul Gandhi

उद्योजकांसाठी देशातील सोने व्यापाऱ्यांना संपवण्याचे षड‌्यंत्र - राहुल गांधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मूठभर बड्या उद्योजकांसाठी देशातील सोने व्यापाऱ्यांना संपवण्याचे षड‌्यंत्र मोदी सरकारचे असून सोने व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेला अबकारी कर रद्द करण्यात यावा यासाठी काँग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवेल, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी हजारो सोने व्यापारी आणि सुवर्ण कामगारांना मंगळवारी दिली.

मुंबईतील झवेरी बाजारात ज्वेलर्स फेडरेशन आणि सुवर्ण कामगार संघटनेद्वारा आयोजित सभेत गांधी बोलत होते. "संतुलन राखणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून खरे तर त्यांचे काम न्यायाधीशासारखे असते. मात्र, केंद्रातील सरकार सध्या वकिलाच्या भूमिकेत आहे. सोने व्यापाऱ्याच्या क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठी छोटे-मोठे सुवर्ण व्यापारी आणि कामगार यांचा हत्येचा प्रयत्नच केंद्र सरकारने चालवला आहे,'' असा गंभीर आरोप गांधी यांनी केला. “ मोदी सरकार सत्तेत येताच आधी त्यांनी शेतकऱ्यांविरुद्ध कायदा आणून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला. तीनदा भूसंपादन अध्यादेश काढले गेले. काँग्रेसने याविरुद्ध कठोर भूमिका घेतल्यानंतर अखेर हा कायदा रद्द करण्यात आला.
विशेष म्हणजे, या कायद्यासाठी तीनदा अध्यादेश काढणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये हा कायदा आपल्याला करायचाच नव्हता, अशी दिशाभूल करणारी माहिती दिली. जे शेतकऱ्यांच्या बाबत घडले तेच आता सुवर्ण कामगार आणि व्यापाऱ्यांबाबत घडत आहे.

सोने व्यापाऱ्यांचा व्यापार हा १५ हजार कोटींचा नाही. त्यामुळे सरकारला वाटते की या व्यापाऱ्यांना सहज चिरडल्या जाऊ शकते. छोट्या व्यापाऱ्यांचे उत्पन्नाचे साधन हिरावून बड्या उद्योगांना देण्याचा हा प्रयत्न आहे, अशी तोफ त्यांनी डागली.

मोदी सरकारचा एकतर्फी विचार : मोदींचा बब्बर शेर ( मेक इन इंडियाचा लोगो) सध्या देशभर दिसतो. मात्र, देशातील ७ कोटी सोने व्यापारी आणि कामगार हे तर मेक इन इंडियाच करीत आहेत. लोकांच्या आयुष्यात हास्य फुलवण्याचे काम हा व्यवसाय करीत आहे. मात्र, मोदी सरकार केवळ एकतर्फी विचार करून या व्यवसायातील छोट्या व्यापाऱ्यांना संपवित आहे,'' असेही ते म्हणाले.

एक ही भूल, कमल का फूल
कालपर्यंत राहुल गांधी यांच्यात नेतृत्व क्षमता नसल्याची टीका करणारा व्यापारी वर्ग या सभेत राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा देत होता. एवढेच नव्हे तर मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी देशाचे भावी पंतप्रधान राहुल गांधी अशी घोषणा करताच उपस्थित हजारो व्यापाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या कार्यक्रमात "एक ही भूल, कमल का फूल' अशा घोषणा देण्यात आल्या. ज्यांना आम्ही निवडणुकीसाठी व्होट आणि नोट दिले तेच आता आम्हाला संपवायला निघाले आहेत,असा आरोप या वेळी सोने व्यापाऱ्यांच्या नेत्यांनी केला. या वेळी हजारो व्यापारी सहभागी झाले होते.