आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendra Avhad Become Cabinet Minister, Divya Marathi

जितेंद्र आव्हाडांना कॅबिनेट मंत्रिपद, गावितांची संधी हुकल्याने फौजिया खान यांना जीवदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आपल्या लाडक्या ‘ब्ल्यू आइड बॉय’ जितेंद्र आव्हाड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली. गेल्या अनेक वर्षांपासूनची आव्हाडांची मंत्रिपदाची इच्छा होती, पण ती पूर्ण होत नसल्याने ते अस्वस्थ होते. मागील फेरबदलात त्यांची मंत्रिपदाऐवजी कार्याध्यक्षपदावर बोळवण केल्याने नाराज असलेल्या आव्हाडांचे स्वप्न आता पूर्ण झाले. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खाते त्यांना मिळणार आहे.

राज्यमंत्री फौजिया खान यांना डच्चू देऊन समाजवादी पक्षाचे आमदार व विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावित यांनाही मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, गावितांची संधी हुकल्याने फौजियांना जीवदान मिळाले.

पवारांनी आव्हाड यांना मंत्रिपद देताना एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. चार महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार असून एकट्या ठाण्यात विधानसभेच्या 24 जागा आहेत. त्यामुळे या भागाला मंत्रिपद देऊन या निवडणुकीत यश मिळवण्याचे मोठे आव्हान आव्हाडांसमोर ठेवले आहे. मुख्य म्हणजे ठाण्यातील गणेश नाईक, वसंत डावखरे अशा ‘सुभेदारांना’ही इशारा दिलाय. यापुढे जोरात काम न केल्यास आव्हाडांची ठाण्यावर ‘सुभेदारी’ चालेल, तुमची नाही. पवारांमुळे छोट्या वयात मोठी झेप घेणार्‍या आव्हाडांना नाईक आणि डावखरे डोळ्यासमोर धरत नाही. आव्हाडांना शक्य तितका विरोध करण्याचे या दोन्ही नेत्यांचे काम सतत चालू असते.

गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, संपूर्ण ठाणे जिल्ह्याऐवजी नवी मुंबईचे संस्थानिक म्हणूनच ते कारभार करतात, तर वसंत डावखरेंना जोडाजोडीच्या राजकारणापलीकडे काही करता येत नाही, अशी त्यांची कामगिरी सांगते. ठाणे जिल्हा हा खरे तर शिवसेनेचा बालेकिल्ला. काही वर्षांपासून या जिल्ह्यात राष्ट्रवादीने पाय रोवायला सुरुवात केली आहे. पवारांना या जिल्ह्यातून आणखी यशाची अपेक्षा असताना नाईक व डावखरेंकडून ती पूर्ण होत नसल्याने त्यांनी आव्हाडांना जाणीवपूर्वक पुढे आणले आहे.