आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारी गणपतरावांच्या नकाराने 'माकप'चे गावित विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता "माकप'चे आमदार जिवा पांडू गावित यांना हा मान दिला जाणार आहे. फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. त्या वेळी गावित हे नूतन सदस्यांना शपथ देतील.

खरे तर सभागृहातील विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून गणपतराव देशमुख यांना हंगामी अध्यक्षपदाचा मान मिळणार होता; परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हे पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे हा मान आता नाशिक जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जिवा पांडू गावित (कळवण) यांना दिला जाणार आहे. गावित १९७८ पासून १९९० पर्यंत सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. १९९५ मध्ये त्यांचा पराभव झाला. १९९९ पासून पुन्हा सातत्याने ते विधिमंडळाचे सदस्य राहिले आहेत. त्यांना विधिमंडळ कामाचा ३५ वर्षांचा अनुभव आहे.

मजूर ते आमदार
१९७८ मध्ये गावित जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीस उभे राहिले तेव्हा ते रोजगार हमी योजनेवर मजूर म्हणून काम करत होते. लढाऊ बाणा आणि जनहिताची कळकळ या त्यांच्या गुणांमुळे गावित तब्बल सात वेळा सुरगणा तालुक्यातून विधानसभेवर जाऊ शकले आहेत. नवा अध्यक्ष निवडेपर्यंत म्हणजे १२ तारखेपर्यंत गावितच विधानसभेच्या अध्यक्षपदी असतील.

लढवय्या कॉम्रेड
रेशन धान्य घरपोच देण्याची योजन गावित यांच्या आग्रहामुळे चालू झाली. सामूहिक विवाह मोठ्या संख्येने लावण्याचा राज्यातला विक्रम त्यांच्या नावावर आहे. वृद्धापकाळ पेन्शन आणि वनहक्क दाव्यांच्या मंजुरीत गावित यांच्यामुळे नाशिक जिल्हा राज्यात आघाडीवर राहिला आहे.