मुंबई - न्यायालयाची दिशाभूल करून माजी मंत्री छगन भुजबळ यांना ३५ दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालय (ईडी) न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना दोषी धरले आहे. न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत त्यांना काय शिक्षा ठोठावयाची हे उच्च न्यायालय ठरवेल, असे न्यायालयाने शुक्रवारी सांगितले. न्यायालयीन अवमाननाप्रकरणी शिक्षा देण्याचे अधिकार ईडी न्यायालयाला नसल्याने हे प्रकरण त्यांनी उच्च न्यायालयाकडे साेपवले अाहे.
भुजबळांना रुग्णालयात दाखल करण्याइतपत कोणताही आजार वा त्रास नव्हता. केवळ एक दिवस ओपीडीत ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज होती. असे असताना डॉ. लहाने यांनी त्यांना बॉम्बे इस्पितळात दाखल करण्याचे पत्र देऊन तेथे त्यांना व्हीआयपी सुविधा मिळतील याची काळजी घेतली, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याचिकेत केला होता. मात्र
आपण निर्दोष असल्याचा दावा डॉ. लहाने यांनी केला होता. मात्र न्यायालयाने तो मान्य केला नाही.
“छगन भुजबळ हे आरामात राहताहेत. त्यांना अनेक राजकीय तसेच गुन्हेगार मंडळी भेटायला येताहेत,’ असा आरोप व त्याच्या पुष्ट्यर्थ व्हिडिओ फुटेजही दमानिया यांनी सादर केले हाेते. लहाने यांच्या आशीर्वादानेच जे. जे. हाॅस्पिटलमधील काही कैदी वाॅर्डमधून उपचार आणि वैद्यकीय चाचण्यांच्या नावाने बाहेर काढले जातात, असा अाराेपही दमानिया यांनी केला होता.
धक्कादायक म्हणजे, भुजबळांना जे. जे. मधून कोणाच्या सांगण्यावरून बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते हा आता संशोधनाचा विषय ठरला आहे. लहाने यांनी याबाबत न्यायालयात आपले म्हणणे मांडताना हात वर केले होते. पण दमानिया यांनी हे सर्व डाॅ. लहाने यांच्या आशीर्वादानेच झाल्याचा आरोप केला. दरम्यान, दाेन्ही बाजूंचे युक्तिवाद एेकल्यानंतर ईडी न्यायालयाने डाॅ. लहानेंना दाेषी ठरवले.
महिनाभर खासगी रुग्णालयात मुक्काम
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर २८ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत छगन भुजबळ हे जे जे हाॅस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणीकरता भरती झाले होते. त्यानंतर २ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर इतके दिवस भुजबळ हे बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये होते. बाॅम्बे हाॅस्पिटलच्या १३ व्या मजल्यावरील २ व्हीआयपी रूममध्ये ३५ दिवस भुजबळांनी मुक्काम केला. भुजबळांना जे जे हाॅस्पिटलमधून बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये हलवताना न्यायालयाला किंवा जेल अधीक्षकांना कळविण्यात आलं होतं का? असा सवाल कोर्टाने केला होता त्यावर लहाने यांनी कोर्टात हजर राहून आपले म्हणणे मांडले होते.
काय आहे प्रकरण?
मुळात विशेष डाॅक्टरांच्या पथकाने छगन भुजबळ फीट असल्याचा अहवाल न्यायालयाला देऊनही त्यांना डाॅ. तात्याराव लहानेंच्या सांगण्यावरून रुग्णालयाबाहेर चाचण्यांसाठी पाठवण्यात आले होते. २ -४ दिवसांचे ३५ दिवस करून भुजबळ हे लहानेंच्या मदतीने तुरुंगात बाहेर आरामात फिरत होते हे स्पष्ट झालेय. आपल्या या आरोपांना सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून दमानिया यांनी केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनची सीडी त्यांनी कोर्टात सादर केली होती.