आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jogendra Kawade News In Marathi, RPI, Congress, Divya Marathi

‘रिपाइं’चा जोगेंद्र कवाडे गट काँग्रेसच्या गळाला लागला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दलित मतांच्या बेगमीसाठी काँग्रेसने चालवलेली धडपड अखेरीस फळाला आली. ‘रिपाइं’चा जोगेंद्र कवाडे गट काँग्रेसच्या गळाला लागला असून पीपल्स रिपब्लिकन पक्ष (पीआरपी) व काँग्रेसंच्या युतीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बुधवारी अधिकृत घोषणा करणार आहेत.राज्यात ‘रिपाइं’चे दखल घेण्याजागे चार गट आहेत. त्यातील रामदास आठवले गट शिवसेना-भाजपबरोबर आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘भारिप’ने महाराष्‍ट्र लोकशाही आघाडी स्थापन केली आहे, तर गवई गट स्वबळावर निवडणुकांना सामोरे जात आहे. आठवले महायुतीत गेल्याने काँग्रेसला ‘रिपाइं’च्या एखाद्या गटाशी सख्य हवे होते. आंबेडकर आणि कवाडे यांच्याशी काँग्रेसची तशी बोलणीही चालू होती; परंतु आंबेडकर यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे काँग्रेसने प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या ‘पीआरपी’शी आघाडीचे मनावर घेतले.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांची मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी शनिवारी सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये आघाडीबाबत एकमत झाले. काँग्रेस राज्यात लोकसभेच्या 27 जागा लढवत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधून कवाडे 1998 मध्ये लोकसभेवर गेले होते. या वेळी कवाडे निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. मात्र, पीआरपीने विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून आघाडीचे घोडे दामटल्याचे बोलले जात आहे.