आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ संपादक अरुण टिकेकर कालवश, दादरच्‍या स्मशानभूमीत अखेरचा निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सामाजिक,सांस्कृतिक घडामोडी इतिहासाचे नेणिवेचे भाष्यकार, प्रख्यात विचारवंत ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांचे वय ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीतल्या विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी प्रा. मनीषा टिकेकर, पुत्र आशुतोष, सून नातू असा परिवार आहे. टिकेकर यांना मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते गेले काही दिवस श्वसनाच्या विकारानेही आजारी होते. पत्रकारितेच्या जगात राहूनही ते विलक्षण अलिप्तवृत्तीने वावरत राहिले. लोकांमध्ये मिसळणारा संपादक या प्रतिमेपेक्षा समाजातील सर्वच घटकांपासून काहीसे अंतर राखून तटस्थपणे निरीक्षण नोंदवून परखडपणे लिहिणारा संपादक होणेच त्यांना जास्त प्रिय होते. ब्रिटिश विचारवंत, युरोपातील उदारमतवाद, त्याचबरोबर महाराष्ट्रातील वैचारिक परंपरा यांच्यावर टिकेकर यांचा पिंड पोसलेला होता. तो त्यांच्या लिखाण, भाषणांतूनही जाणवत असे. आपल्या अभ्यासू, विश्लेषक लिखाणाने त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत स्वत:ची टिकेकर शैली निर्माण केली.
१९ व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास हा त्यांचा खास आवडीचा विषय होता. १९ वे शतक हे भारतासाठी प्रबोधनाचा काळ होता. त्यातील न्या. महादेव गोविंद रानडे, आगरकर आदी समाजसुधारकांच्या नेमस्त विचारसरणीचा डॉ. अरुण टिकेकर यांचे व्यक्तिमत्व लिखाणावर विशेष प्रभाव होता. अरुण टिकेकर हे मुळातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक. लाला लजपतराय महाविद्यालयामध्ये सुमारे साडेसहा वर्षे अध्यापन केल्यानंतर ते यू. एस. लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या दक्षिण आशिया विभागामध्ये साहित्य भाषातज्ज्ञ, अॅक्विझिशन स्पेशालिस्ट या पदांवर कार्यरत होते. विविध भारतीय भाषांतील उत्तमोत्तम पुस्तकांच्या प्रती तसेच या पुस्तकांचे मायक्रोफिल्मिंग करुन तो ठेवा यू. एस. लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या ग्रंथालयात जतन करून ठेवणे असे काम त्यांनी तेथे केले. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियामध्ये रिसर्च चीफ, महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात सिनिअर असिस्टंट एडिटर म्हणून त्यांनी काम पाहिले. लोकसत्ताचे संपादक म्हणून त्यांची १९९१ ते २००२ सालापर्यंतची कारकिर्द संस्मरणीय होती. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारासह वृत्तपत्र साहित्य क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार अरुण िटकेकरांना त्यांच्या अनमोल कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आले होते.
ग्रंथप्रेमी टिकेकर कुटुंबीय :
डॉ. अरुण टिकेकर यांचे संपूर्ण कुटुंबच ग्रंथप्रेमी होते. त्यांचे वडील चिंतामणराव टिकेकर हे ग्रंथव्यवसायात होते. चिंतामणरावांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयाला सुपूर्द केला. अरुण टिकेकरांचे काका श्री. रा. टिकेकर हे अग्रगण्य इतिहास संशोधक होते. श्री. रा. टिकेकरांनीही आपला ग्रंथसंग्रह मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाला दिला होता. अरुण टिकेकर यांचे ज्येष्ठ बंधू अरविंद टिकेकर हे मुंबई विद्यापीठाचे ग्रंथपाल होते. अरुण टिकेकरांच्या पत्नी प्रा. डॉ. मनिषा टिकेकर या राज्यशास्त्रातील तज्ज्ञ असून त्यांनीही काही पुस्तके अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. डॉ. अरुण टिकेकरांकडे जो मोठा वैयक्तिक ग्रंथसंग्रह होता. त्यातील मोठा भाग त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाकडे काही वर्षांपूर्वी सुपूर्द केला होता. तर या संग्रहातील काही पुस्तके त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघालाही प्रदान केली होती.