आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Journalist Prashant Pawar's Book '31st August 1952' Released

‘३१ ऑगस्ट १९५२’ हे पुस्तक म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज, लक्ष्मण गायकवाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘गावगाड्याबाहेरच राहणा-या, अस्पृश्याहूनही अस्पृश्य, दलितांहूनही दलित अशा भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न समाजाने आधी समजून घेतले पाहिजेत. त्यासाठी ‘३१ ऑगस्ट १९५२’ हे पुस्तक महत्त्वाचा दस्तऐवज ठरू शकतो,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी शनिवारी व्यक्त केले.

फोटो - पत्रकार प्रशांत पवार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना लक्ष्मणराव गायकवाड, बाबा भांड, मुक्ता दाभोलकर व इतर मान्यवर.

‘दिव्य मराठी’चे डेप्युटी एडिटर (मुंबई) प्रशांत पवार यांच्या ‘३१ अाॅगस्ट १९५२’ या भटक्या विमुक्तांचा हुंकार मांडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. माटुंगा येथील कर्नाटक संघ सभागृहात हा कार्यक्रम झाला. गायकवाड म्हणाले की, ‘भटक्या-विमुक्तांना कधीच समाजाने सामावून घेतले नाही. त्यामुळे ते कायम अनेक हक्कांपासून, सुविधांपासून वंचित राहिले. त्यांचा हुंकार लेखणीतून तेही पारदर्शीपणे व थेटपणे अापल्यापर्यंत पाेहाेचवण्याचे काम ‘३१ अाॅगस्ट...’मधून पवारांनी केले अाहे.’ लेखक प्रशांत पवार म्हणाले, ‘भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा शाेध घेत असताना त्यांच्या पालापालांवर फिरताना केवळ सर्वेक्षण करायचा हेतू नव्हता तर त्यांच्या प्रश्नांशी मला एकरूप व्हायचे हाेते, त्यांच्या दु:खात मला सामावून घ्यायचे हाेते, त्यांची व्यवस्था मला समजून घ्यायची हाेती. त्यातून मी पत्रकार म्हणून सदर लेखन केले. हे सदर पुस्तकरूपाने अाणणे मला अावश्यक वाटले,’ असे नमूद केले. साकेत प्रकाशनाचे बाबा भांड यांनी अशा पुस्तकांची समाजाला गरज असल्याचे सांगत प्रकाशक म्हणून भूमिका मांडली. कवी वैभव छाया यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, हे पुस्तक भटक्या-विमुक्तांचे मूलभूत प्रश्न अत्यंत नेमकेपणाने मांडत असल्याने अत्यंत संवेदनशीलतेने ते वाचकांपर्यंत पाेहाेचते.’
‘बुधन..’ने मांडली समाजवेदनेची तीव्रता : अहमदाबाद येथील दक्षिण बजरंगे छारा यांच्यासह कलाकारांनी ‘बुधन बाेलता हैं’ हे लघुनाट्य या वेळी सादर केले. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या छारा या गुजरातमधील समाजाच्या या तरुणांनी भटक्या-विमुक्तांचे प्रश्न या लघुनाट्यातून मांडले. पारधी, फासेपारधी, छारा कुठल्याही राज्यातील हा समाज भीषण समस्यांना सामाेरे जात अाहे याची तीव्रता या लघुनाट्याने नाटकाची तथाकथित चाैकट माेडत प्रेक्षकांपर्यंत पाेहोचवली.
‘मसणजाेगी’ माहितीपटाच्या फर्स्ट लूकचे प्रकाशन
माहितीपट दिग्दर्शिका सविता प्रशांत यांनी गेले काही वर्षे संशाेधन करून ‘मसणजाेगी’ या समाजावर अाधारित माहितीपट बनवला अाहे. या माहितीपटाच्या फर्स्ट लूकचे प्रकाशनही या वेळी करण्यात अाले. हा माहितीपट लवकरच राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय महाेत्सवांमध्ये दाखवण्यात येणार अाहे.