मुंबई - लोकसभा निवडणुकीत दणकून मार खाल्ल्यानंतर स्वत: विधानसभा निवडणूक लढण्याचे उसने अवसान आणणारे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर घुमजाव केल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारताच मनसे प्रमुख राज ठाकरेंची तिळपापड झाला. ‘असे प्रश्न मला विचारू नका,’ असे पत्रकारांना दरडावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. मात्र शेवटपर्यंत पत्रकार प्रश्नावर ठाम राहिल्यावर मात्र राज निरुत्तर झाले.
मंत्रालय- विधिमंडळ वार्ताहर संघाने सोमवारी राज ठाकरे यांचा वार्तालाप आयोजित केला होता. " मुंबईत जाहीरसभा घेऊन तुम्ही निवडणूक लढण्याची घोषणा केली आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस तुम्ही माघार घेतली. यामुळे तुमच्या नेतृत्वाबद्दल विश्वसनीयतेचा प्रश्न निर्माण झालाय असे वाटत नाही का?', या प्रश्नावर राज संतप्त झाले. ‘कसला विश्वसनीयतेचा प्रश्न? मी तर नागपुरात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केलेय,’ अशी आगपाखड त्यांनी पत्रकारांवर केली. ‘ मात्र
आपल्याच पक्षाच्या जाहीर सभेत एक घोषणा करायची आणि नंतर पत्रकार परिषदेत घूमजाव करायचे, हे कितपत योग्य आहे?' या प्रतिप्रश्नावर मात्र त्यांचा तोलच गेला. "तुम्ही जरा जपून शब्द वापरा, असे कसे तुम्ही मला विचारता, असले प्रश्न विचारू नका,' असे आवाज चढवून त्यांनी संबंधित पत्रकाराला दरडावले. यावरही संबंधित पत्रकाराने, "आपण वापरलेला शब्द योग्यच असून जाहीरसभांची विश्वसनीयता आणि पत्रकार परिषदेतील घोषणा यांची विश्वसनीयता यात काही फरक नाही का? तुम्हाला हवे तेच प्रश्न आम्ही विचारायचे का?', अशा प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर राज ठाकरेंची बोलतीच बंद झाली. आपण माघार का घेतली आणि तो निर्णय कसा योग्य होता, हे पटवून देणेही त्यांना जमलेच नाही.
आराखड्याला पाठिंबा
‘मनसेचा विकास आराखडा आरोप प्रत्यारोपांच्या वातावरणात झाकोळला वाटते का?’ या प्रश्नावर राज म्हणाले, "खरे आहे विकास आराखड्याला माध्यमांमधून फारशी प्रसिद्धी जरी मिळाली नाही. मात्र तरीही माझ्या पक्षाच्या संकेतस्थळावर या विकास आराखड्याला चांगला प्रतिसाद आहे. आतापर्यंत लाखभर लोकांनी विकास आराखड्याला भेट दिली आहे’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पुढे वाचा... हापूसबाबत मोदींचे वक्तव्य