- नऊ वर्षांपूर्वी झालेल्या या भयावह बॉम्बस्फोटानंतर तपासाचे आव्हान होते. तुम्ही तपासाला कशी सुरुवात केली?
टाजणे : त्या वेळी एटीएस टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या फार मोठी नव्हती. आठ अधिकारी व २५ जण त्यांना साह्य करणारे, पण लोकलमधील बॉम्बस्फोटाचा तपास आल्यानंतर या टीमची ताकद वाढवण्यात आली. २५ अधिकाऱ्यांसोबत १०० जणांचा सहायक स्टाफ देण्यात आला. या टीमची सूत्रे के. पी. रघुवंशी यांच्याकडे देण्यात आली.
- तपासाची कशी व्यूहरचना करण्यात आली?
टाजणे : आरोपींना शोधून काढण्यासाठी ७ टीम्स बनवण्यात आल्या होत्या, तर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याकरिता ३ टीम्स सज्ज केल्या. प्रत्येक टीमला टार्गेट देण्यात आले होते. अगदी ठरवून आणि संशोधनात्मक काम केल्याने स्फोटाच्या १२ दिवसांतच एक आरोपी कमल अन्सारीला पकडण्यात यश आले. एटीएसच्या कामाला गुन्हे अन्वेषण विभागाने मोलाची मदत मिळाली. त्यामुळे अन्सारीनंतर १३ आरोपींना काही महिन्यांत अटक आली. हैदराबादेतून नावेदच्या मुसक्या आवळल्या. या दोघांकडील माहितीनुसार इतरांना पकडणे सोपे गेले.
- या घटनेच्या तपासावेळी कर्मचाऱ्यांना किती वेळ काम करावे लागत होते?
टाजणे : एटीएस तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्या वेळी वर्षभर रात्रंदिवस काम केले. बरेच अधिकारी अनेक दिवस घरीच गेले नव्हते. दिवसाचे २४ तास कमी पडत होते. बॉम्बस्फोटाची दाहकताच इतकी होती की आम्हाला मृत तसेच जखमी व्यक्तींना न्याय तर द्यायचा होता. पण, आरोपींना पकडण्याचे आव्हान होते. त्यामुळे आम्हीही जिवाची पर्वा न करता काम केले. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यासाठी आणखी ९ महिने मेहनत घ्यावी लागली होती.
- आज मागे वळून बघताना काय वाटते?
टाजणे : मुंबईकर चाकरमानी नेहमीप्रमाणे आपले दिवसभराचे काम आटोपून थकूनभागून घरी निघाले होते. काही दोष नसताना त्यापैकी सुमारे दोनशे जणांना प्राण गमावले तर लागलेच, पण ८०० पेक्षा जास्त जण जखमी झालेल्यांपैकी कायमचे जायबंदी झालेल्यांचे दु:ख खूप आहे. कमावता माणूसच घरी बसल्याने अशा जायबंदी कुटुंबांची फरपट झाली. आजही तो िदवस आठवला की अंगावर काटा उभा राहतो. मात्र, ९ वर्षांनी का होईना या सर्वांना न्याय िमळाल्याने दुसऱ्या बाजूला कुठे तरी समाधानाचीही भावना आहे.
- बॉम्बस्फोटासारख्या घटना यापुढे तरी रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी?
टाजणे : कोणत्याही कटामागे दहशतवाद्यांची खूप दिवसांपासूनची तयारी असते. ही तयारी कुठे चालू आहे यासाठी पोलिसांचे गुप्तहेर सक्षम व सतर्क असणे गरजेचे आहे. खबऱ्यांचे जाळेही दूरपर्यंत असायला हवे. जगभरात आता दहशतवाद्यांनी नेटवर्क खूप अत्याधुनिक केले असून, ते शोधून काढण्यासाठी सायबरची टीमही सक्षम बनवायला हवी. जनतेनेही निर्धास्त राहू नये. आपल्या परिसरात तसेच आजूबाजूला काय चालले आहे, हे दक्षतेने पाहायला हवे. संशयास्पद हालचाली वाटत असल्यास वेळ न घालवता पोलिसांना कळवायला हव्यात. शेवटी गुन्हे रोखण्याचे काम पोलिसांबरोबर जनतेचेही आहे.
पुढील स्लाइडवर वाचा मेव्हणा निर्दोष, पण भाऊ ठरला दोषी