आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झालेल्या तारे- तारकांना राजकारणात आणण्याचा प्रकार तसा नवा नाही. आजवर सर्वच प्रमुख पक्षांनी हा प्रघात पाडला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही अभिनेत्री जुही चावला हिला आगामी विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याची विनंती केली होती. मात्र, ‘राजकारण नको रे बाबा’ म्हणत तिने मोदींची ही ऑफर नम्रपणे नाकारली.
गुजरातमधील काँग्रेस आमदार अर्जुन मोडवाडिया यांच्या विरोधात जुहीने निवडणूक लढवावी, अशी मोदींची इच्छा होती. मात्र, त्याला नकार देत जुहीने सांगितले की, मी राजकारणात कधीही प्रवेश करणार नसून स्वत:ला त्यायोग्य समजत नाही. तसेच मी बॉलीवूडमध्ये आनंदी असून या क्षेत्रातच काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे या प्रकारच्या अफवा कोठून येतात याचे आश्चर्य वाटते. मला दोन मुले असून त्यांचीही देखभाल करावी लागते. त्यामुळे राजकारणात येणे कदापिही शक्य नाही, असेही जुहीने सांगितले. जुही सध्या ‘कृष्णा आणि कंस’ या चित्रपटात व्यग्र आहे. हा चित्रपट भारतातील पहिला अॅनिमेटेड चित्रपट आहे. या चित्रपटातील यशोदेच्या पात्राला तिने व्हॉइस ओव्हर दिला आहे. या चित्रपटाची निर्मिती कमलेश पांडेय यांनी केली असून दिग्दर्शन विक्रम वेतुरी यांनी केले आहे.
याआधी अनेक कलाकारांनी राजकारणात उडी घेतली होती. मात्र यातील अनेकांना अपयशच पचवावे लागले. महानायक अमिताभ बच्चन, गोविंदा हे त्याचे उदाहरण आहेत. तर हेमामालिनी, जयाप्रदा, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखे कलाकार आजही संसदेत आहेत.
सन ऑफ सरदारमध्येही भूमिका
अश्विन धीर यांची निर्मिती असलेला मल्टिस्टाटर ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटामध्ये जुही चावला महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आहे. अॅक्शन, ड्रामा, रोमँटिक, कॉमेडी अशी धमाल असणारा हा चित्रपट 13 नोव्हेंबर रोजी सर्वत्र झळकणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.