आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Junket Trip Now For Mumbai Corporators In Adaman!

मुंबई पालिकेतील नगरसेवक अंदमान दौ-यावर, महापौरांच्या उपस्थितीने चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती सदस्यांसह महापौर स्नेहल आंबेकर यांनी अंदमान-निकोबार बेटावरील अभ्यास दौ-याला गेल्याने चर्चा सुरु झाली आहे. या दौ-याबाबत प्रोटोकॉल पाळला नसल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. तर भाजपच्या नगरसेवकांनी हा अभ्यास दौरा नसून सहल असल्याचे सांगत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या दौ-यावर बहिष्कार टाकला आहे. मनसेने या दौ-याचे समर्थन केले आहे.
महापालिका प्रशासनाने मात्र हा स्थायी समिती सदस्यांसाठीचा अभ्यास दौरा असल्याचे म्हटले आहे. अंदमानमधील रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, मलनि:स्सारण आदींचा अभ्यास करण्यासाठी 5 दिवसाचा दौरा आखल्याचे म्हटले आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत हा दौरा असेल. महापौर स्नेहल आंबेकर यांनीही हजेरी लावली आहे. या दौ-यात डझनहून अधिक स्थायी समितीचे सदस्य असलेल्या नगरसेवकांनी हजेरी लावली आहे. यातील बहुतांश शिवसेनेचे नगरसवेक आहेत. या दौ-यासाठी प्रत्येक नगरसेवकासाठी 65 हजार खर्च करण्यात येणार असून एकूण खर्च 14 लाखांच्या घरात येणार आहे.
स्थायी समितीच्या अंदमान दौ-यात महापौरांनी सहभाग घेतल्याने विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीने या दौ-यावर बहिष्कार टाकत निषेध केला आहे. महापौर प्रोटोकॉल पाळत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या दौ-याचे समर्थन केले आहे. हा अभ्यास दौरा आहे. मौजमजा व फिरण्यासाठी हे नगरसेवक गेलेले नाहीत. अंदमान-निकोबार बेटावर मुंबईप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त पाऊस पडतो. मात्र तेथे पाणी तुंबले जात नाही. त्यामुळे तेथील रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था व वॉटर लॉगिंग कशाप्रकारे केले जाते हे अभ्यासण्यासाठी हे लोक गेले आहेत. हे नगरसेवक अंदमान दौ-याचा अहवाल सादर करतील व तेथे काय पाहिले, शिकले व आपल्याकडे काय सुधारणा करता येईल याची माहिती प्रशासनाला देतील असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेत असलेल्या सर्व 27 स्थायी समिती सदस्यांसाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दांडी मारल्याचे दिसत आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज दोन दिवसीय मुंबई दौ-यावर येत असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी दांडी मारली आहे. तर, येत्या 30 तारखेला काँग्रेस मुंबईत निदर्शने करणार आहे. हैदराबादमधील स्कॉलर रोहिथ वेमुलाच्या हत्येप्रकरणी काँग्रेस शनिवारी आंदोलन करणार आहे. इतर काही सदस्य वैयक्तिक कारणाने जाऊ शकले नाहीत.
शिवसेनेकडे 20 वर्षापासून मुंबई महापालिकेची सत्ता आहे. गेल्या 20 वर्षात रस्ते कसे बांधावे व पेव्हिंग ब्लॉक कसे बसवावेत हे माहित नाही तर सेनेने सत्तेतून पायउतार व्हावे अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी या दौ-याचे समर्थन केले असले तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या दौ-याची कल्पना नसल्याचे सांगितले जात आहे.