आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातल्या उन्हात: जालन्याचा कैलास वाघमारे रुपेरी पडद्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रख्यात शाहीर संभाजी भगत यांच्या "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकात मुख्य भूमिका साकारणारा जालन्याचा कैलास वाघमारे आता लवकरच रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित 'मनातल्या उन्हात' चित्रपटात २० वर्षांच्या तरुणापासून ६५ वर्षांच्या वृद्धापर्यंतची भूमिका कैलासने साकारली आहे. हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

जालना जिल्ह्यातील चांदई या गावातील कैलासने महाविद्यालयात असताना अनेक पथनाट्य, एकांकिका, लोकनाट्यात सहभाग घेत अभिनयाचा प्रवास सुरू केला. एम. ए. मराठीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मुंबईत प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक व अभ्यासक वामन केंद्रे यांच्याकडून त्याने नाट्यशास्त्राचे दोन वर्षांचे शिक्षण घेतले. सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर यांनी त्याला सह्याद्री वृत्तवाहिनीवरील माझी शाळा मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यानंतर संदेश भंडारे यांच्या "महादू' चित्रपटात त्याने छोटीशी भूमिका साकारली. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली संभाजी भगत यांच्या "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकामुळे. कैलास आता मुख्य नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटील यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केले आहे. "मनातल्या उन्हात'मध्ये कैलासबरोबर किशोर कदम, समीर धर्माधिकारी, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, मिताली जगताप, हंसराज जगताप, मंथन पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पालकांच्या स्वप्नांचा चित्रपटात संदेश
मी साकारत असलेली भूमिका ही वास्तवातील आहे. आपल्या आई-वडिलांचीही काही स्वप्ने असतात. मात्र, मुले स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याच्या नादात आई-वडिलांची स्वप्ने विसरतात, त्यांचाही विचार व्हावा, असा संदेश चित्रपट असल्याचे तो म्हणाला.

पायलटची भूमिका
चित्रपटातील तात्याची भूमिका अत्यंत आव्हानात्मक होती. २० वर्षांचा तरुण ते ६५ वर्षांच्या वृद्धापर्यंतची ही भूमिका आहे.कारगिल लढाईत भाग घेतलेले एअरफोर्समधील पायलट असलेले संजय पाटील या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. मी त्यांच्या वडिलांची म्हणजेच तात्यांची भूमिका साकारत आहे. मिताली जगताप यात माझी नायिका आहे.
कैलास वाघमारे, अभिनेता