आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाकीच्या अंतरंगातील सप्तरंगी दुनिया, 'काळा घोडा'मध्ये पोलिसांच्या चित्रांचे प्रदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीच्या आसपासचा परिसर..वेळ साधारण दुपारचे दोन वाजताची..काळा घोडा फेस्टिव्हलमधील एक स्टॉल..वॉटरकलर किंवा मिक्स मीडियाचा वापर करून पांढऱ्या शुभ्र कॅन्व्हासवर चितारलेली सुंदरशी हळुवार अशी निसर्गचित्रं, तर कुठे फक्त कलर पेन्सील आणि पेनाचा वापर करून कॅनसॉन पेपरवर रेखाटलेली व्यक्तिचित्रं, एवढ्या सुंदर चित्रांच्या चित्रकाराविषयी चौकशी करावी आणि तो पोलीस आहे असे कळल्यावर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.. सध्या असाच आश्चर्याचा धक्का काळा घोडा फेस्टिव्हलला भेट देणाऱ्या प्रत्येकाला बसतो आहे. याला कारण ठरत आहेत ते अंकुश धुपकर, संजय सावंत, अनिल मोहिते आणि विकास लवंदे हे चार पोलिस कर्मचारी...
पोलिस.. हा शब्द उच्चारल्यावर नजरेसमोर रुबाबदार गणवेश परिधान केलेली करड्या नजरेची आणि लष्करी शिस्तीच्या व्यक्तीची प्रतिमा उभी राहते. मात्र, अंगभूत कलेने चौघांनी या प्रतिमेला छेद दिला आहे. गुन्हेगारी, बंदोबस्त, अतिरिक्त कामाचा तणाव, वरिष्ठांचा त्रास अशा वातावरणातही आपल्यातला चित्रकार जिवंत ठेवण्याची कला चौघांनी आत्मसात केली. म्हणूनच गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या कलाकृती काळा घोडा फेस्टिव्हलचे आकर्षण ठरत आहेत. कामाच्या ताणामुळे पोलिस आत्महत्यांचा आकडा वाढत असताना वेळेचा सदुपयोग करत कलेच्या माध्यमातून कामाचा ताण हलका
करण्याचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
चित्रांसाठीवेळ कसा काढता? : वर्षभरव्यग्र दिनक्रमातून जसजसा वेळ मिळेल, तशी आम्ही ही चित्रे काढतो. चित्रांसाठी खास असा वेगळा वेळ काढणे शक्यही नाही. मात्र, फेस्टिव्हलसाठी आम्हाला आठ दिवस खास सुटी दिली जाते, असे आर्थिक गुन्हे शाखेचे हवालदार संजय सावंत यांनी सांगितले.
पोलिसखात्याला ५० टक्के रक्कम : चित्रांच्याविक्रीतून उभ्या राहिलेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम आम्ही पोलिस कल्याण निधीत जमा करतो, असे विशेष शाखेचे हवालदार विकास लवंदे यांनी सांगितले.
आबांनीकेले होते कौतुक : पोलिसांच्याचित्रांचे कौतुक करणाऱ्यांमध्ये माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचाही समावेश आहे. त्यांनी जेव्हा या प्रदर्शनाला भेट दिली होती, तेव्हा केलेल्या कौतुकाची आठवणही अमली पदार्थविरोधी पथकात कार्यरत अनिल मोहितेंनी काढली.

हे सगळे कसे जमते?
पोलिसांची जनमानसातील प्रतिमा बदलण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून २००७ मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी आम्हाला प्रदर्शनात सहभागी होण्याची परवानगी दिली. तेव्हा स्टॉलला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. पुढे नियमित सहभागी होण्याचे आम्ही ठरवले. सुदैवाने पुढच्या आयुक्तांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, असे वरळीच्या शस्त्रागारात शस्त्रे दुरुस्ती करणारे हवालदार अंकुश धुपकर म्हणाले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटलांनी प्रदर्शनाला भेट दिल्याची आठवण त्यांनी काढली.