आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळंबोली अत्याचार प्रकरण : संस्थाचालक करंजुलेला फाशीची शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कळंबोली येथील कल्याणी महिला व बाल सेवा संस्थेतील गतिमंद मुलींवरील बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी संस्थेचा संस्थापक रामचंद्र करंजुले याला सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा ठोठावली. त्याचे हे कृत्य दुर्मिळात दुर्मिळ आणि अत्यंत घृणास्पद असल्यामुळे त्याला फाशीची शिक्षा योग्य असल्याचे मत न्यायालयाने या वेळी नोंदवले.

करंजुले याला फाशी व जन्मठेपेच्या शिक्षेसह 19 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. खंडू नानाजी कसबे व प्रकाश विठ्ठल खडके या दोघांना जन्मठेप, तर संस्थेची व्यवस्थापिका सोनाली मोहन बडदे व पार्वती श्यामसुंदर मावळे यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावली. नानाभाऊ करंजुले या आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्याखाली दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. महिलांवरील अत्याचारांत वाढ होत असताना अशी कृत्ये करणा-यांना कठोर शिक्षा झाली नाही, तर गुन्हेगार न्यायव्यवस्थेला गृहीत धरण्यास सुरुवात करतील. त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा करून समाजापर्यंत योग्य तो संदेश जाणे गरजेचे आहे, असे मत न्यायालयाने शिक्षा सुनावताना व्यक्त केले. आरोपी करंजुले याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही.

लैंगिक छळ झालेल्या मुली गतिमंद, अनाथ आहेत. अशी घृणास्पद कृत्ये करणा-या आरोपींना कमी शिक्षा देण्यात आली अथवा त्यांना दयेस पात्र ठरवण्यात आले, तर समाजाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही. रामचंद्र करंजुलेला जिवंत राहण्याचा अधिकार नसून त्याचे अस्तित्व समाजासाठी घातक आहे. त्याला फाशीची शिक्षाच योग्य आहे, अशा शब्दांत न्यायालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.

काय आहे प्रकरण?- मार्च 2011 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. करंजुले याने संस्थेच्या इतर कर्मचा-यांसह संस्थेतील 14 ते 18 वयोगटातील 20 गतिमंद मुलींचा लैंगिक छळ केला होता. त्यातील 4 मुली कर्णबधिर व मूक आहेत. त्यांच्या अत्याचारांना विरोध करणा-या मुलींना जिवे मारण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला होता. तसेच आरोपी या मुलींचा गरम चमचा व सिगारेटचे चटके देऊन छळ करत, असा जबाब या मुलींनी दिला होता. बालकल्याण समितीने या संस्थेला भेट दिल्यानंतर संस्थापक व कर्मचा-यांकडून होणारा हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर मागील वर्षी जानेवारीमध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.