आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचा वांद्र्यातही "कणकवली पॅटर्न'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वांद्र्याच्या पोटनिवडणुकीत बाजी मारत राज्याच्या राजकारणात पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेले काँग्रेस नेते नारायण राणे प्रतिस्पर्धी पक्ष शिवसेनेविरोधात "कणकवली पॅटर्न'चा वापर करत आहेत.
हा पॅटर्न म्हणजे काँग्रेसपेक्षा त्यांना आपले धाकटे चिरंजीव आमदार नितेश राणेंच्या स्वाभिमानी संघटनेवर असलेला भरवसा होय! स्वाभिमानचे सध्या एक हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते वांद्र्यात मुस्लिम, उत्तर भारतीय वस्तांबरोबरच मराठी वस्त्यांमध्ये रात्रंदिवस तळ ठोकून आहेत. भली मोठी ताकद उभी करूनही काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते राणेंच्या पारड्यात मते टाकण्यासाठी जीवाचे रान करतीलच, यात्री खात्री नसल्यानेच नितेश राणे यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत.
राणेंना कुडाळ मतदारसंघात पराभवाचा जबरदस्त फटका बसला होता. ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणेंना लोकसभेत पराभव पत्कारावा लागल्यानंतर विधानसभेत राणेंनी नितेश यांचा कणकवली पॅटर्न राबवण्याचा नि निर्णय घेतला. त्याआधी १९९० पासून राणेंचे निवडणुका जिंकण्याचे स्वत:चे तंत्र होते. त्यात पक्षाला फारसे स्थान नव्हते. परशुराम उपरकर, राजन तेली, बाळा वळंजू, संजय पडते, काका कुडाळकर, गोट्या सावंत अशी राणेंच्या खास माणसांना हे तंत्र अवगत होते. मतदारसंघातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचून राणेंशिवाय इतर ठिकाणी मत हलता कामा नये, याची चोख व्यवस्था या तंत्रात होती. पण, हे तंत्र लोकसभेत अपयशी ठरल्याने विधानसभेत नितेश यांनी कणकवली पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला. लोकसभेनंतर राणेंच्या खास माणसांना पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आले आणि नितेश यांनी आपल्या पद्धतीने कुडाळ तसेच कणकवली निवडणुका लढवल्या. यासाठी राज्यभरातील स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते कोकणात मुक्कामाला होते. त्यामुळे काँग्रेस निष्ठावंत दुखावले तरी नितेश यांना पर्वा नव्हती. स्वाभिमानच्या जोरावर नितेश यांनी कणकवली पिंजून काढत भाजपच्या प्रमोद जठारांना हरवले. मात्र तेवढी ताकद ते कुडाळमध्ये उभी करू शकले नाहीत. मी पडलो तरी माझा मुलगा त्याच्या पॅटर्नमुळे निवडून आला, यात समाधान मानणाऱ्या राणेंनी म्हणूनच आता वांद्रेत याच पॅटर्नवर भर दिला आहे.

काँग्रेसची राणेंना मनाने साथ नाही
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते शरीराने राणेंसोबत दिसत असले तरी त्यापैकी ९० टक्के नेते हे मनाने प्रचारातून दूरच आहेत. मुख्य म्हणजे राणेंनाच काँग्रेसचा भरवसा वाटत नाही. राणे जिंकल्यास ते जड होऊ शकतात, याची चव्हाण तसेच राधाकृष्ण विखे-पाटील यांना चांगलीच कल्पना आहे.
दुसरी बाजू म्हणजे प्रिया दत्त, कृपाशंकर सिंह, नसीम खान, बाबा सिद्दिकी या वांद्रे तसेच उत्तर-पश्चिम मुंबईतील नेत्यांचे आपसात पटत नसल्याने त्यांच्या भांडणाचा फटका बसू शकतो, यामुळे हे सर्वजण एकत्रपणे प्रचार करतीलच, याची राणेंना खात्री नाही. राणेंनी आमदारांची बैठक बोलावून मदतीचे आवाहन केले खरे, पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.