मुंबई - बेळगाव येथे जानेवारी महिन्याच्या शेवटी होणा-या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये कन्नड आणि मराठी कलाकारांच्या माध्यमातून कन्नड आणि मराठी नाट्यसंस्कृतीचा मिलाफ घडविण्याचा प्रयत्न अ.भा.मराठी नाट्य परिषद करणार आहे. नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील मराठी कलाकारांच्या बरोबरीने कन्नड कलाकारही
मराठी भाषेतूनच नाट्याविष्कार साकारणार आहेत.
बेळगावचा सीमाप्रश्न किंवा अलीकडे उठलेला ‘बेळगावी’ नामकरणाचा प्रश्न कलेच्या, नाट्यसंस्कृतीच्या आड येऊ न देण्याचे बेळगावातील कलाकारांनी, स्थानिक संस्थांनी तसेच महाराष्ट्रातील नाट्य परिषदेने ठरवले आहे.
या नाट्य संमेलनामध्ये फय्याज शेख अध्यक्षा असल्याने मराठी कलाकारांसह कन्नड कलाकारही संगीत नाटक सादर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
त्यामुळे कन्नड आणि मराठी भाषक कलाकारांच्या माध्यमातून हे नाट्य संमेलन दोन संस्कृतींचा मिलाफ साधेल अशी आशा आयोजकांना आहे. बेळगाव येथील स्थानिक कलाकार पु.ल. देशपांडे यांच्या धारवाड व बेळगावाशी असलेल्या प्राध्यापक असतानाच्या काळातील सौहार्दामुळेही मराठी नाटक-साहित्याशी जोडले गेले आहेत. हाच धागा पकडून नाट्य परिषदेने नाट्य संमेलनात कन्नड भाषक कलाकारांचाही अंतर्भाव केला आहे. त्यामुळे या संमेलनाकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील कलाकारांचे लक्ष लागले आहे.
रस्ता कर बंद करण्यासाठी प्रयत्न
बेळगावात येणा-या गाड्यांसाठी तेथे न परवडणारा कर लावला जातो. तो नाट्य संमेलनास येणा-या कलाकारांसाठी लावण्यात येऊ नये यासाठी नाट्य परिषदेचे प्रयत्न सुरू असल्याचे नाट्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर यांनी सांगितले. असे झाल्यास नाट्य संमेलन अधिक सुलभतेने कलाकारांना सामावून घेऊ शकेल, असे करंजीकर यांचे म्हणणे आहे.