आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे कपिल पाटील यांचा भाजपात प्रवेश, सेनेचे राजाराम मांगले मनसेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते एका पक्षातून दुस-या पक्षाचा रस्ता धरत पूर्वीच्या पक्षावर आगपाखड करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत 200 कार्यकर्ते भाजपमध्ये आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थिती त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला ठाणे ग्रामीणमध्ये मोठा झटका बसल्याचे मानले जाते. पाटील ठाणे जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना भिवंडीमधून भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भिवंडी मतदारसंघातून भाजपला उमेदवार मिळणे कठीण असल्यामुळे त्यांनी विरोधीपक्षातीलच नेत्याला गळाला लावल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकर यांना पक्षात प्रवेश देऊन मावळ मतदारसंघाचे तिकीट दिले. त्यानंतर भाजपने आता त्यांच्या जिल्ह्याध्यक्षांना फोडले आहे.
दुसरीकडे, राजाराम मांगले यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला. मनसे प्रवेशानंतर त्यांनी शिवसेनेत लोकसभेची उमेदवारी मिळालेले राहुल शेवाळे आणि त्यांची पत्नी हुकुमशाही पद्धतीने कार्यकर्त्यांना वागवतात असा आरोप केला आहे.
याआधी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेले राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोफ डागली होती. मिलिंद नार्वेकर यांचे नाव न घेता राहुल नार्वेकरांनी, शिवसेनेत पद नसलेल्यांना सर्वाधिकार असल्याचा आरोप केला होता.