बेळगाव- बेळगावमध्ये उद्यापासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 95 वे नाट्यसंमेलन सुरु होत आहे. मात्र, या नाट्यसंमेलनाला कर्नाटक पोलिसांनी परवानगी देताना 20 जाचक अटी घातल्या आहेत. यात प्रामुख्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत कोणताही ठराव मांडता येणार नाही, तसेच सीमाप्रश्नाबाबत देखावा, नाटक, स्फुट आणि राजकीय-सामाजिक भूमिका घेऊन भाष्य करू नये अशा अटींचा समावेश आहे.
दरम्यान, यापूर्वीच मराठी नाट्य महामंडळाचे अध्यक्ष मोहन जोशी यांनीही सीमाप्रश्नाचा ठराव मांडणार नसल्याचे म्हटले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. आता कर्नाटक पोलिसांनीही जोशी यांचीच री ओढल्याने बेळगावमधील सीमावासियांच्या व्यथा नाट्यसंमेलनात मांडता येणार नाहीत.
उद्या सकाळी या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यासाठी बेळगावातील सीपीएड ग्राऊंड येथे बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी सज्ज झाली असून 60 वर्षांनंतर बेळगावात नाट्यसंमेलन होत असल्याने बेळगावकरांमध्ये प्रचंड उत्साह व कुतुहल असल्याचे चित्र दिसून येते. नियोजित अध्यक्ष फय्याज शेख यांच्या अध्यक्षतेखाली भरणार्या या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अशोक साठे आहेत. मात्र, कर्नाटक पोलिसांनी 20 जाचक अटी टाकल्याने सीमावासियांचा हिरमोड झाला आहे.
उद्या (शनिवारी) दुपारी नाट्यसंमेलनाध्यक्ष फय्याज शेख यांची प्रगट मुलाखत व गप्पा होणार असून त्यांची मुलाखत पत्रकार जयंत पवार घेणार आहेत. अरुण काकडे, आशालता वाबगांवकर, मोहन जोशी, दीपक करंजीकर, अशोक देशपांडे यांचाही सहभाग यात आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी बेळगावनगरीतून नाट्यदिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी परिसंवाद, चर्चा या कार्यक्रमांऐवजी नाट्यप्रयोग होणार असून एकां
किका, नाट्यसंगीत, बालनाट्ये, प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांचे प्रयोगही होणार आहेत.