आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई गँगरेपः तरुणीला सुनसान जागी का पाठवले? पत्रकारांचा मासिकाला प्रश्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छायाचित्रकार तरुणीवर गुरुवारी झालेल्या सामूहिक बलात्कार कांडात मुख्य सूत्रधाराची भूमिका कासीम बंगाली (21) या अग्रीपाड्याच्या सराईत दरोडेखोराने निभावली होती. त्याने पीडित तरुणीवर दोनवेळा बलात्कार केला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी रविवारी किला कोर्टात सादर केली.

गुरुवारी शक्तिमिल परिसरात पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यातील कासीम बंगाली या 21 वर्षीय आरोपीला रविवारी पहाटे महालक्ष्मी परिसरातून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिटने अटक केली. तिसरा आरोपी सिराज खान याला शनिवारी रात्रीच अटक झाली होती. या दोघांना रविवारी किला कोर्टातील सुटीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. दोघा आरोपींना 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत कॅमे-याला काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय व्यावसायिक छायाचित्रकारांनी घेतला.


अटकेचं वर्तुळ पूर्ण
अब्दुल चांद सत्तार शेख (वय 18) : शुक्रवारी दुपारी सर्वप्रथम या आरोपीस धोबीघाट (महालक्ष्मी) परिसरातून अटक झाली. त्याने इतर चार आरोपींची माहिती दिली. आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये याच्यावर दरोड्याचाही गुन्हा दाखल आहे.
विजय जाधव (21) : भंगार चोर असणा-या या आरोपीस शनिवारी दक्षिण मुंबईतील मदनपुरा भागातील मित्राच्या व्हिडिओ पार्लरमधून पहाटे अटक करण्यात आली.
सिराज खान (24) : आग्रीपाडा येथील रहिवासी असलेला हा आरोपी शनिवारी रात्री गोवंडी येथील झोपडपट्टीत सापडला.
कासीम बंगाली (21) : आग्रीपाडा येथील रहिवासी व मुख्य सूत्रधार असलेल्या या आरोपीस मुंबई सेंट्रल परिसरातून रविवारी पहाटे अटक. ताडदेव पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल.
सलीम अन्सारी (27) : सातरस्ता परिसरात राहणा-या पाचव्या आरोपीस रविवारी दुपारी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले.


तरुणी म्हणेल ती शिक्षा!
‘माझा मुलगा असे कृत्य कधीच करणार नाही. त्याला फसवलं आहे. त्या तरुणीसमोर माझ्या मुलाला उभे करा. जर त्याने खरंच गुन्हा केला असेल, तर तरुणी म्हणेल ती शिक्षा द्या’, असे बलात्कार प्रकरणातील मुख्य सूत्रधार कासीम बंगाली याच्या आईचे म्हणणे आहे.


कुटुंबीयांनी मानले आभार
‘माझ्या मुलीवर गुदरलेल्या या प्रसंगात आपण सर्वांनी अतीव संवेदनशीलता दाखवली. त्याबद्दल समाज, माध्यमे, पोलिस आणि शासनाचे आम्ही आभारी आहोत. जसलोक रुग्णालयाचे प्रशासन, डॉक्टर आणि संचालक यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवला तरच गुन्हेगारांना कठोर आणि जलद शिक्षा मिळेल. माझ्या मुलीला सावरण्यासाठी एकांत हवा आहे. कृपया, संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. तिची ओळख उघड होऊ दऊ नका. माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आपण असाच पाठिंबा द्याल, अशी आशा आहे. सर्वच पीडितांना असाच पाठिंबा द्यावा’, अशी विनंती पीडितेच्या कुटुंबीयांनी पत्राव्दारे केली आहे.


ती आता खाऊ लागलीय!
पेशंट ठीक आहे. ती आहार घेऊ लागली आहे. आमचे डॉक्टर सर्व ती काळजी घेत आहेत. माध्यमे, केंद्र व राज्य शासनाने आम्हाला पूर्ण सहकार्य केले. पेशंटवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. पोलिसांच्या सहयोगामुळे आम्ही पेशंटची काळजी घेण्यात यशस्वी ठरलो. जसलोक रुग्णालय