आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katyar Movie Selected For Indian Panaroma In IFFI

‘कट्यार’ ची जादू ४६ व्या इफ्फी महोत्सवात, २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत "कट्यार काळजात घुसली. हे नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०१५ च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबरच विविध प्रकारच्या चित्रपटांसाठी काही विशेष विभाग तयार केलेले असतात. यातील इंडियन पॅनोरमा हा भारतीय भाषांमधील दर्जेदार चित्रपटांसाठीचा एक खास विभाग असून यावर्षी झी स्टुडिओ निर्मित आणि सुबोध भावे दिग्दर्शित "कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाची निवड झाली आहे. येत्या २१ नोव्हेंबरपासून देश विदेशातील अनेक चित्रपटांचा हा महोत्सव आयोजित केला गेला आहे.

या निवडीबद्दल सुबोध म्हणाला, “हा केवळ माझा किंवा या चित्रपटाचा सन्मान नसून तो खऱ्या अर्थाने कट्यारचे जनक पुरुषोत्तम दारव्हेकर, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा सन्मान आहे. मराठी संगीत नाटकाची एवढ्या मोठ्या स्तरावर दखल घेतली गेली ही गौरवाची बाब आहे. इफ्फीच्या माध्यमातून जगभरातील रसिकांसमोर भारतीय शास्त्रीय संगीताची जादू पसरेल याचा आनंद आहे.”

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पुरुषोत्तम दारव्हेकर यांची आहे.
गोव्यासाठी चित्रपटाचे खास महत्त्व
गोव्यात पार पडणाऱ्या या महोत्सवासाठी तसं कट्यारचं एक वेगळं महत्त्व आहे. कट्यारचं अभिजात संगीत ज्यांच्या सुरांनी आणि स्वरांनी व संगीताने सजलं ते पं. जितेंद्र अभिषेकी यांचं जन्मगाव गोव्यातील मंगेशी. ज्या मातीत या महान कलाकाराचा जन्म झाला त्याच मातीत त्याच्या संगीतावर आधारित एका कलाकृतीचा असा सन्मान होणं हा एक आगळा वेगळा योगच आहे. पुरूषोत्तम दारव्हेकर यांच्या शब्दांनी सजलेली ‘घेई छंद मकरंद, ‘तेजोनिधी लोह गोल, ‘सुरत पिया की छिन बिसरायी’ ही आणि अशीच इतर लोकप्रिय गाणी. ही गाणी त्याच चालीवर पण नव्या आवाजात या चित्रपटामधून ऐकायला मिळणार आहेत. याशिवाय यात ‘दिल की तपीश’, ‘सूर निरागस हो’, ‘मन मंदिरा’, ‘सूर से सजी संगिनी’ या नवीन गाण्यांचाही समावेश आहे. यातील मूळ गाण्यांचं पुनर्ध्वनिमुद्रण आणि ही नवीन गाणी शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केली आहेत.